विकी भालेराव
खालापूर : खालापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) ‘एकला चलो’च्या भूमिकेत आहे. त्यामुळे या नगरपंचायतची निवडणूक खऱ्या अर्थाने रंगतदार होणार आहे. शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप यांच्यामध्ये थेट चौरंगी लढत पहायला मिळणार आहे. तसेच, बंडखोर व अपक्ष उमेदवार यांची भूमिकासुद्धा तितकीच महत्त्वाची असेल.
खालापूर नगरपंचायतसाठी दि. २१ डिसेंबर रोजी मतदान होत असून या निवडणुकीत सगळेच पक्ष स्वतंत्र लढत आहेत. त्यामुळे यावेळी ही निवडणूक मोठी रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका पहिल्यांदाच स्पष्ट करत स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी आपली तयारी पूर्णपणे सुरू केली होती. तसेच, मागील काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षानेही स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा नारा देत त्यांनीही आपले उमेदवार शोधण्याची सुरुवात केली आहे.
दरम्यान, शिवसेना व शेकाप यांची भूमिका स्पष्ट नसल्याने येथील स्थानिक उमेदवार व मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र सोमवारी शेकापच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करत आपण ‘एकला चलो रे’च्या भूमिकेतून स्वतंत्र लढणार असल्याचे जवळपास निश्चित केले आहे.
जागावाटपात बिनसले?
शिवसेनेचे स्थानिक आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी मागेच जाहीर केले होते की, खालापूर नगरपंचायतची निवडणूक शेतकरी कामगार पक्षासोबत युती करून लढणार आहे. मात्र, जागा वाटपाचा फॉर्म्युला जमत नसल्याने ही सेना-शेकाप युती होत नसल्याचे येथील स्थानिक मतदारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, शिवसेनेकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून येथील जनतेलाही युतीबाबत अजूनही शाशंकता वाटत आहे.