मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झाले होते. रविवारी सकाळपासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीच्या दिशेने अनुयायी दाखल झाले होते.
दरवर्षी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळतो, मात्र यावर्षी कोरोनाचे सावट दिसून आले. त्यामुळे लाखोंच्या संख्येने उसळणाऱ्या गर्दीला यावर्षी बऱ्याच प्रमाणात उसंत मिळाल्याचे दिसून आले.
कोरोनाच्या संकटामुळे गर्दी न करता बाबासाहेबांना ऑनलाइन अभिवादन करा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले असल्याने चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना परवानगी आहे; मात्र गर्दी टाळण्यासाठी थेट प्रक्षेपण उपलब्ध करण्यात आले होते.
दरम्यान चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्यांची कोरोना चाचणी तसेच करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची सुविधाही करण्यात आली होती. दरवर्षी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटतो, मात्र कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी निर्बंध घालण्यात आले होते. यंदाही कोरोना तसेच ओमायक्रॉनचा संभाव्य धोका असल्याने पालिकेने आवश्यक ती खबरदारी घेतलेली दिसून आले.
सोमवारी, ६ डिसेंबरला गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने दादर आणि शिवाजी पार्क परिसरात बॅरिकेडस लावून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वेने दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवरील फेरीवाल्यांना हटवण्यात आल्याने त्यामुळे रस्ते मोकळे झाले आहेत. अभिवादनासाठी येणाऱ्यांना शिस्तीने जाता येईल, अशी सोय प्रशासनाने यावेळी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतराचे पालन करण्यासाठी खबरदारी, तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच रेल्वे व बेस्टने प्रवासाची मुभा असल्याने तपासणीही वाढवण्यात येऊन रेल्वे स्थानक व परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.