मुंबई : मुंबई, पुण्यात १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ओमाक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिस्थितीचे निरीक्षण केले जात आहे. टास्क फोर्ससोबत चर्चा करून शाळांची नियमावली बनवली आहे. त्यामुळे शाळांबाबत येत्या चार-पाच दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
गायकवाड पुढे म्हणाल्या की, लहान मुलांच्या लसीकरणाबाबत कोणतीही माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आलेली नाही. मात्र, लहान मुलांचे आरोग्य, सुरक्षा ही प्राथमिकता आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण सुरू व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.
तिसऱ्या लाटेलाही थोपवू – मुंबई महापौर
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की, शाळांबाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वाट पाहावी लागेल. आपण तिसऱ्या लाटेला थोपवू.
गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणूमुळे राज्यात शाळा, महाविद्यालये बंद होती. ती काही दिवसांपासून हळूहळू पूर्ववत सुरू होतं असताना आता ओमाक्रॉन बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळे पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होणार का याबाबत पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.