मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका विजयानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी क्रिकेटपटूंसह सपोर्ट स्टाफचे कौतुक केले आहे. सीनियर्सच्या दुखापती आणि युवा क्रिकेटपटूंची उत्कृष्ट कामगिरी ही निवडसमितीसाठी मोठी डोकेदुखी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. किवींविरुद्धच्या मालिका विजयासह द्रविड यांनी त्यांच्या प्रशिक्षकाच्या इनिंग झोकात सुरुवात केली.
विजयाने मालिकेचा शेवट करण्याचा मोठा आनंद आहे. कानपूर कसोटीत विजय थोडक्यात हुकला. आम्हाला तिथे खूप मेहनत करावी लागली. मुंबईतील दुसऱ्या कसोटीचा निकाल एकतर्फी लागला, आम्ही ३७२ धावांच्या फरकाने विजय मिळवला. संपूर्ण मालिकेचा विचार करता काही सेशन्स आमच्या विरुद्ध गेले. त्यानंतर पुनरागमन करण्यासाठी संघर्ष करावा लागला. याचे श्रेय संपूर्ण संघाला जाते. नवीन क्रिकेटपटूंनी लीड करतानाच संधीचा फायदा उठवल्याचा आनंद वाटतो. फिरकीपटू जयंत यादवने पाचव्या दिवशी अचूक मारा केला. आदल्या दिवशीच्या चुकांमधून त्याने बोध घेतला. मयांक अग्रवाल, श्रेयस अय्यर या आघाडीपटूंसह वेग्वान गोलंदाज मोहम्मद सिराजने संधीचे सोने केले. बॅटमध्येही चमक दाखवू शकतो, हे अक्षरने दाखवून दिले. संपूर्ण मालिकेत त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ते पाहणे खूप छान वाटले, असे द्रविड यांनी सांगितले.
फॉलोऑन न देण्याबाबत …
आम्हाला माहीत होते, की आमच्याकडे भरपूर वेळ आहे. त्यामुळे आम्ही फॉलोऑनचा फारसा विचार केला नाही. संघात अनेक युवा फलंदाजही आहेत.अशा परिस्थितीत त्यांना फलंदाजीची संधी द्यायची होती. आम्हाला माहीत होते, की आम्ही भविष्यात अशा परिस्थितीत असू शकतो जिथे आम्हाला कठीण परिस्थितीत असे करण्यास भाग पाडले जाऊ शकते. म्हणून प्रयोगाची ही एक उत्तम संधी होती, असे द्रविड यांचे म्हणणे पडले.