Sunday, July 21, 2024

निराकरण

कथा : डॉ. विजया वाड

लग्न झालं की, साऱ्या शंका फिटतील. सगळ्यांचं निराकरण होईल.” मंदाची सावत्र आई आवर्जून हसत म्हणाली. मंदाला घबराटून सोडत म्हणाली. “नवरा म्हणजे ‘न’वरा असा माणूस. हव्वं तेव्हा ओरबाडून त्याच्या हक्काचं सुख मिळवणारा. आपलं असं ‘जे जे’ आपल्याला वाटतं ‘ते ते’ लुबाडणारा चोर, दरोडेखोर” ती तिची बावऱ्या मंदाला घाबरवण्याची आता अंधुक संधी होती.
“म्हणजे काय काय करतो तो?”
“अगं वाट्टेल ती मस्ती!”
मंदा घाबरून गेली. जगाशी तिचा संपर्क सावत्रपणाने येऊ दिला नव्हता. आता नवरा नि ती आनंदी राहणार होती. ४५व्या वर्षी सुख अचानक गवसले होते. सावत्र मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरी ‘एकदाची’ चालली होती. आता तिचंच राज्य. नवरा कमी शिकलेला. मंदा बीए, मुलगा बारावी नापास. शेतकरी. आडगावी राहणारा. पडगावी कष्ट करणारा. नाव मात्र मनोहर! नाजूक चणीचा. मंदाची पंचाईत झाली. ‘हो’ म्हणावे तर हा नाजूक नि ही वडाचे झाड. ‘न’ म्हणावे तर ‘हो’ कार कष्टाने मिळविलेले एकुलते स्थळ हातचे गेले असते. नि ती परत सावत्रपणाच्या कचाट्यात सापडली असती. म्हणून मग ‘हो’ म्हणाली. मंदाचे ‘न’ होते, एकदाचे ठरले. मनोहर कष्टकरी होता. राकट जागी काम होते. वेलीवर एखादे जड बुंध्याचे झाड पडावे, तर गुंफून घ्यावे अशी स्थिती होती.

मंदा बिचारी लग्न करून सासरी आली. मनोहरची ती पहिली रात्र आलीच. ती थांबणार थोडीच होती. वेळा कधी चुकत नाहीत. ‘जे होईल ते’ असा विचार करीत मंदाने मनोहरच्या खोलीत प्रवेश केला. नवरा ‘जे’ करेल ते ‘सोसायची’ तयारी ठेवीत. मैत्रिणींचा अनुभव चांगला नव्हता. तो ‘फुलाला’ चुरगळावे तसे शरीर वापरणारा दुष्ट माणूस असं सांगायच्या नि गोग्गोड हसायचा; त्यांची गंमत कधी मंदाला कळालीच नाही. रात्री तांब्या थडथडवत ती खोलीत शिरली.
“मला नं तुमची खूप भीती वाटते,” तिनं सांगून टाकलं.
“माणूसच आहे मी… भीती कसली?”
“मला तुम्ही चुरगळाल अशी,” ती थरथरत म्हणाली.
“झोप शांत. मी खाली झोपतो. तू पलंगावर झोप.”
“शप्पथ?” तिनं घाबरून विचारलं.
“तुझी शपथ.” …“मी अंगाला हातही नाही लावणार… आश्वासक शब्द आहे हा.”
“मग मी झोपू?” तिनं विचारलं, “झोप” तो म्हणाला. नि थकून झोपून गेली शातं स्वस्थ! पहाटे जाग आली तिला तर अंगाचं मुटकुळं करून झोपलेला तो! अंगावर पांघरूण नव्हते. तिने ते मायेने घातले. त्याने गुरगुटून घेतले. झोपेत ‘थँक्यू’ ही म्हटले सवयीने. तिला पांघरूण नव्हते. नवरा-बायको! एका पांघरूणात! तिला हसू फुटले, त्याने शब्द पाळला होता. आडमाप देह तिला आता फारसा भीतिदायक नाही वाटला. गुटगुटीत लहान मूल जसं!
“झोपा स्वस्थ” तिने थोपटले. भीती कमी झाली होती.
“झोप झाली का? इतक्या लवकर?”
“हो नं! पहाटे उठायची सवय.”
“ऑफिस? आता सुट्टीवर?”
“हो. २ दिवस सुट्टी.”
“ये. थोपटतो.” ती कुशीत अलगद शिरली. मृदु, मुलायम ऊबदार वाटला स्पर्श. जराही धसमूस नाही. आश्वासक! सारेच…
“हे खूप छान आहे,” ती मोकळेपणाने बोलली. भीती लोप पावली होती. “मी धसमुसळा नाही,” तो म्हणाला. “मित्र म्हणाले….” “काय” ती विचारती झाली.
“हेच ते! तू जाड बुंधा नि ती नाजूक डहाळी!”
“अस्सं?”
“अगं खरंच!” … “रेशीम वस्त्रासारखी अंगभर जपून.”
“खरं का?”
“मित्र खूप मोकळेपणी बोलतात. नो आडपडदा!”
“इतकं उघडं वागडं?”
“याहूनही.”
“इश्श” “ते इश्शवर मी जीव द्यायला तयार आहे.”
“अय्या!” “आता आणखी लोभावू नकोस.”
“असं हो काय?” तिनं ओठांचा चंबू केला. त्याला खूप मोह झाला… ओठ सीलबंद करण्याचा. त्याने तो मोठ्या मुष्किलीनं आवरला.
“मला तर मैत्रिणींनी खूप घाबरवलं होतं.”
“काय? काय काय घाबरवलं?”
“तो अस्सं! कस्सं करेल…”
“ते अस्सं कस्सं म्हणजे काय?”
“ओठ आवळेल… नि आम्ही नै जा!”
“लाजतेस?” “भीती कमी झालीय.” “ए म्हण ना!” … “मनू” … त्यानं गोंजारलं.
“मनोहर, मनू…” तिनं कुजबुजत हाकारलं अन् साऱ्या शंकांचं निराकरण एका आश्वस्त मिठीत झालं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -