नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रियतेत आघाडीवर असल्याचे अनेक सर्वेक्षणातून पुढे आले आहे. आता सरत्या वर्षात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या भारतीय व्यक्तीमत्त्वांच्या यादीत पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.
गेल्या वर्षाचा अपवाद वगळता २०१७पासून पंतप्रधान मोदी या यादीत अव्वल स्थानावर आहेत. गेल्या वर्षी बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल अनेकांनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. याहू इयर इन रिव्ह्यूमध्ये नेटकऱ्यांनी सर्वाधिक सर्च केलेली बातमी, व्यक्तीमत्त्वे, विविध कार्यक्रम आणि बातम्यांमध्ये चर्चेत असणाऱ्या व्यक्तीमत्त्वाबद्दल आढावा घेतला जातो. पुन्हा या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
याहू २०२१ इयर इन रिव्ह्यू या यादीत पंतप्रधान मोदींनंतर दुसऱ्या स्थानी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली असून, तिसऱ्या स्थानी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. चौथ्या स्थानावर टीव्ही मालिका अभिनेता दिवंगत सिद्धार्थ शुक्ला आहे. सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याचा मुलगा आर्यन खानचाही या यादीत समावेश झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी आर्यनवर एनसीबीने कारवाई केली होती. आर्यन खान या यादीत सातव्या स्थानावर आहे.
सेलिब्रिटींच्या यादीत पुनीत राजकुमार हे चौथ्या स्थानावर आहेत. दाक्षिणात्य पुनीत राजकुमार याचे झालेले अकाली निधन चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेले.