नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन विषाणूमुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, मात्र ही लाट जीवघेणी नसेल, असा दावा ‘सीएसआयआर’चे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी केला आहे.
नव्या व्हेरियंटमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता शास्त्रज्ञांना वर्तवली आहे. मात्र, ‘सीएसआयआर’ ही शक्यता फेटाळली आहे. आपण कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा अभ्यास केला, तर तिसरी लाट तयार करू शकणाऱ्या व्हेरिएंटचे सर्व गुणधर्म त्याच्यात आहेत. मानवी प्रतिकारशक्तीला तो बेमालूमपणे चकवा देऊ शकतो हे समोर आलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे, असं डॉ. अग्रवाल म्हणाले.
ओमायक्रॉन व्हेरिएंट सापडण्याच्याही आधीपासून तिसऱ्या लाटेविषयीची भीती व्यक्त केली जात आहे. तिचे स्वरूप किती धोकादायक असेल, याविषयी मतमतांतरे होती. मात्र, आता वेगाने प्रसार होण्याचा गुणधर्म असलेला ओमायक्रॉन व्हेरिएंट सापडल्यामुळे तिसऱ्या लाटेविषयी पुन्हा दावे केले जात आहेत. ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चर्चा सुरू झाली आहे. या व्हेरिएंटवर उपलब्ध लसी प्रभावी ठरतील की नाही? इथपासून ते तिसऱ्या लाटेचं संकट येईल का आणि आलं तर ओमायक्रॉनमुळेच येईल का, इथपर्यंत सर्व बाबतीत दावे केले जात आहेत.