डेहराडून (वृत्तसंस्था) : या शतकाच्या सुरुवातीला अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतात दळणवळण वाढवण्याची मोहीम सुरू केली होती आणि त्यावर त्यांनी भर दिला. मात्र, त्यानंतर १० वर्षे देशात असे सरकार होते, ज्याने देशाचा आणि उत्तराखंडचा बहुमूल्य वेळ वाया घालवला. देशात पायाभूत सुविधांच्या नावावर १० वर्षां केवळ घोटाळे झाले. देशाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही दुप्पट मेहनत केली आणि आजही करत आहोत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यावेळी एका सभेला पंतप्रधानांनी संबोधित केले. आपले पर्वत केवळ आपला विश्वास आणि आपल्या संस्कृतीचे मजबूत आधार नाहीत, तर ते देशाचे संरक्षण करणारे मजबूत किल्ले आहेत. पर्वतीय क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचे जीवन अधिक सुखकर करणे ही गोष्ट आपल्या सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रम असलेल्या बाबींपैकी एक आहे. दुर्दैवाने, अनेक दशके जे लोक सरकारात होते त्यांच्यासाठी कधी धोरण तयार करण्याच्या पातळीवर देखील ह्या लोकांचा विचार अस्तित्वात नव्हता, असे ते म्हणाले.
आधीच्या सरकारांनी सीमाभागातील पर्वतीय प्रदेशात पायाभूत सुविधा उभारण्यासंदर्भात गांभीर्याने काम केले नाही याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. ते म्हणाले, देशाच्या सीमेजवळ रस्ते बांधायला हवे होते, पूल बांधायला हवे होते. पण त्यांनी याकडे लक्षच दिले नाही. ‘एक श्रेणी- एकसमान निवृत्तीवेतन’, आधुनिक शस्त्रास्त्रे, दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर ह्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे योग्य रीतीने लक्ष पुरविले गेले नाही आणि त्यामुळे देशाच्या लष्कराच्या मनोधैर्याचे प्रत्येक पातळीवर खच्चीकरण झाले. सध्या सत्तेत असलेले सरकार जगातील कोणत्याही देशाच्या दबावाखाली येऊ शकत नाही. आम्ही देशाला प्रथम स्थानी ठेवणे आणि नेहमीच देशाला पहिले महत्त्व देणे हाच मंत्र जपणारे लोक आहोत, असेही त्यांनी सांगितले.
एकाच जातीला, धर्माच्या लोकांना प्राधान्य देणे, विकासविषयक धोरणे लागू करताना भेदभाव करणे अशा पद्धतीच्या राजकारणावर पंतप्रधानांनी तीव्र टीका केली. देशातील लोकांना सक्षम होण्याची संधी न देणाऱ्या आणि त्यांच्या गरजांसाठी त्यांना सतत सरकारवर अवलंबून राहण्यास भाग पाडणाऱ्या विकृत राजकारणावर देखील त्यांनी हल्ला चढविला. देश चालविताना वेगळा मार्ग स्वीकारणाऱ्या विद्यमान सरकारच्या विचारसरणीबद्दल त्यांनी विचार मांडले, आमचा हा वेगळा मार्ग आहे, भले हा कठीण मार्ग असेल पण तो देशाच्या कल्याणाचा मार्ग आहे. हा मार्ग ‘सबका साथ-सबका विकास’ चा मार्ग आहे. आम्ही म्हणालो होतो की ज्या योजना आम्ही सुरु करू त्या सर्वांसाठी लागू असतील, त्यात भेदभाव नसेल. आम्ही व्होट बँकेच्या राजकारणाचा आधार घेत नाही तर सामान्य लोकांना सोयीसुविधा पुरविण्याला प्राधान्य देतो. देशाला मजबूत करणे हा आमचा दृष्टीकोन आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.