रत्नागिरी (वार्ताहर) :अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला सलग दोन दिवस झोडपून काढले; मात्र शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतली असून काहीकाळ ढगाळ वातावरण होते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘जवद’ वादळामुळे समुद्र खवळल्याने मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. तर केरळ, तामिळनाडूतील शंभरहून अधिक मच्छीमारी नौकांनी भगवतीसह जयगड बंदराचा आसरा घेतला आहे.
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात ३९.३३ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटामुळे बुधवारी सायंकाळी रत्नागिरीतील वीज पुरवठा दोन तास खंडित करण्यात आला होता. त्यामुळे फिरण्यासाठी रत्नागिरीतील किनारी भागात आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. अनेकांनी माघारी जाणे पसंत केल्याने पर्यटन व्यावसायिकांचे नुकसान झाले. दिवसभर जिल्ह्यात सगळीकडेच पावसाळी वातावरण होते. त्याचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे.
पूर्व किनारीपट्टीवर जवद चक्रीवादळ निर्माण झाले असून खोल समुद्रातील वातावरण बिघडले आहे. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारीही पूर्णतः ठप्प आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या जाळ्यांनी मासेमारी करणाऱ्या ३ हजार ७७ नौका आहेत. त्यात ३ हजार ५१९ यांत्रिकी तर ४४२ बिगर यांत्रिकी नौका आहेत. दिवसभरात मोठी उलाढाल ठप्प झाल्याचे मच्छीमारांनी सांगितले. तसेच वादळामुळे केरळ, तामिळनाडूतील शंभरहून अधिक मच्छीमारी नौका आश्रयासाठी भगवती, मिऱ्या बंदरात आल्या होत्या