मुंबई: वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी शनिवारी न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू (स्पिनर) एजाझ युनूस पटेलने पहिल्या डावात भारताच्या सर्वच्या सर्व दहा विकेट घेताना विश्वविक्रम रचला. इंग्लंडचे महान ऑफस्पिनर जिम लेकर तसेच भारताचे माजी लेगस्पिनर, माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यानंतर डावातील सर्व विकेट टिपणारा पटेल हा जगातील केवळ तिसरा गोलंदाज आहे. पाहुण्या संघातील या ३३ वर्षीय क्रिकेटपटूचा जन्म मुंबईतील आहे. मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीवर कोरोनाचे सावट आहे. त्यातच नव्या व्हेरियंटमुळे केवळ २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली गेली. शनिवारी मॅच पाहायला आलेले प्रेक्षक लकी ठरले. एकाच बॉलरने दहा विकेट घेण्याचा दुर्मीळ विश्वविक्रम याची देही याचि डोळा पाहता आला. त्यामुळे एजाझ पटेल एका दिवसात‘हीरो’ ठरला.
जोगेश्वरीमध्ये अद्याप घर
एजाझचा जन्म २१ ऑक्टोबर १९८८मध्ये झाला. त्याचे कुटुंब जोगेश्वरी येथे वास्तव्यास होते. आठ वर्षे तो मुंबईत वाढला. त्यानंतर एजाझचे आई-वडील १९९६मध्ये न्यूझीलंड येथे स्थायिक झाले. एजाजचे एक घर अद्याप जोगेश्वरी येथे आहे. त्याची आई ओशिवरा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होती. वडिलांचा रेफ्रिजरेशनचा व्यवसाय होता. कोरोना साथीच्या आधी त्याचे कुटुंबीय प्रत्येक वर्षी भारतात सुट्टीसाठी येत असे. मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी एजाझच्या कुटुंबातील काही सदस्य वानखेडे स्टेडियमवर आले होते. येथील गरवारे पॅव्हेलियन बसून ते एजाझला पाठिंबा देत होते.
२०१८मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण
एजाझने २०१८मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. पदार्पणातील सामन्यात दुसऱ्या डावात निम्मा संघ गारद करताना छाप पाडली. त्यानंतल मे २०२०मध्ये न्यूझीलंड बोर्डाने त्याला मध्यवर्ती करारात सामावून घेतले. यापूर्वी, १० सामने खेळताना एजाझने २९ विकेट टिपल्या आहेत. त्यात तीन वेळा पाचहून अधिक विकेट घेतल्यात. ११व्या कसोटीत पहिल्या डावात दहा विकेट घेत त्याने कसोटी विकेटची संख्या ३९वर पोहोचवली आहे. ११९ धावा देत १० विकेट ही त्याची पारंपरिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. तो न्यूझीलंडकडून सात टी-ट्वेन्टी सामनेही खेळला आहे. त्यात ११ विकेट घेतल्या आहेत. १६ धावा देत ४ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
वेगवान गोलंदाज व्हायचे होते.
एका डावात १० विकेट घेत इतिहास रचणाऱ्या एजाझला फिरकी गोलंदाज नव्हे तर वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द करायची होती. त्याची ही ‘अनटोल्ड’ स्टोरी आहे. मुंबईहून न्यूझीलंडमध्ये गेला तेव्हा एजाझला वेगवान गोलंदाज व्हायचे होते. तो न्यूझीलंडच्या १९-वर्षांखालील राष्ट्रीय शिबीरातही सहभागी झाला होता. त्यावेळी तो वेगवान गोलंदाजीच करत होता. मात्र, त्यात कुठे तरी कमतरता जाणवत होती. त्याच्यामध्ये फिरकी गोलंदाजीची गुणवत्ता ठासून भरली आहे, हे माजी फिरकीपटू आणि प्रशिक्षक दीपक पटेल यांनी हेरले. तसेच वेगवान गोलंदाजी सोडून फिरकीकडे मोर्चा वळवायला सांगितला. सुरुवातीला एजाझ तयार नव्हता. पण दीपक पटेल यांनी एजाजला सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. त्याच्या शरीराची ठेवण, गुणवत्ता आणि फिरकीला लागणाऱ्या असलेल्या गोष्टी पटवून दिल्या. त्यानंतर फिरकीपटू होण्यासाठी तयार झाला. त्यामुळे आपल्या कुटुंबियांसह एजाझच्या आयुष्यात दीपक पटेल ही व्यक्ती सर्वात महत्वाची आहे.
…