मुंबई: भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एजाजने एका डावात १० बळी घेत अनिल कुंबळेच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. एका डावात १० बळी घेणारा एजाज कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला. भारताच्या मोहम्मद सिराजची विकेट घेत एजाजने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. न्यूझीलंडकडून आतापर्यंत रिचर्ड हेडलीने सर्वाधिक ९ बळी घेतले होते. हा विक्रमसुद्धा एजाजने आता मोडीत काढला आहे.
कुंबळे आणि एजाजव्यतिरिक्त इंग्लंडच्या जिम लेकर यांनी हा विक्रम पहिल्यांदा रचला होता. १९५६मध्ये इंग्लंडच्या लेकर यांनी (५१.२-२३-५३-१०) ओल्ड ट्रेफर्डवर ऑस्टेलियाविरुद्ध आणि १९९९मध्ये कुंबळेने (२६.३-९-७४-१०) पाकिस्तानविरुद्ध १० बळी मिळवले होते. आथा एजाजने १० बळी परदेशात मिळवण्याची किमया साधली. एजाज पटेलने ४७.५ षटकात ११९ धावांत १० बळी घेतले. एजाज हा जन्माने मुंबईकर आहे.