प्रशांत जोशी
डोंबिवली : अवकाळी पावसाने हजारो पाकोळी पक्षी भरकटून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात उंच टॉवरवर येऊन पडले. अवकाळी पावसाने सुमारे ७ डिग्री तापमान कमी झाले आणि त्यामुळे हे पाकोळी पक्षी (स्विफ्ट) पडल्याची महिती पॉजचे संस्थापक निलेश भणगे यांनी दिली.
पाकोळी हा पक्षी साधारणपणे चिमणीच्या आकाराचा असून रंगाने काळा अथवा तपकिरी असतो. शरीर मजबूत आणि पंख लांब असतात. पसरलेल्या पंखांची लांबी सु. ३३ सेंमी. असते. पिसे दगडी, तपकिरी किंवा काळ्या रंगाची असतात. त्याच्या गळा, मान व पोट या भागांवर क्वचित काही खुणा दिसून येतात. डोक्याचा भाग रुंद असतो. चोच अगदीच लहान व बाकदार असते. चोचीच्या खाली एक पांढरा ठिपका असतो. शेपूट लहान किंवा किंचित लांब असून दुभंगलेले असते. पाय आखूड परंतु दुर्बल असतात. त्यामुळे त्याला जमिनीवर किंवा तारांवर इतर पक्ष्यांसारखे बसता येत नाही. मात्र, बोटांच्या नखांद्वारे तो उभ्या पृष्ठभागाला घट्ट पकडून लटकतो. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.
सामान्यपणे वनात राहणारे पाकोळी पक्षी मानवी वस्तीच्या आजूबाजूला थव्याने राहतात. जुनाट किल्ले, पडक्या व ओसाड इमारती आणि घरांच्या खोबण्या यांमध्ये ते घरटी तयार करतात. या पक्ष्यांचा आवाज मोठा असून ते सतत किलबिलाट करत असतात. घरट्यासाठी ते कागदाचे कपटे, दोरे, झाडाची पाने इ. वस्तूंचा वापर करतात. या सर्व वस्तू, माती आणि लाळ एकत्र करून ते बशीच्या आकाराचे गोलसर घरटे तयार करतात.
भारतात पाकोळीची आणखी एक जाती आढळत असून तिचे शास्त्रीय नाव ‘एपस’ असे आहे. तिला ‘कॉमन स्विफ्ट’ असे इंग्रजी नाव आहे. ही जाती आकाराने एपस ॲफिनिस पेक्षा मोठी असून ती स्थलांतर करते. या पक्ष्याच्या पसरलेल्या पंखांची लांबी सु. ४० सेंमी. असते.
दरम्यान अवकाळी पावसाचा परिणाम या पाकोळी पक्ष्यांच्या जीवनावर झालेला दिसून आला आहे.