मुंबई: महाराष्ट्रात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रूग्ण कल्याण डोंबिवलीत सापडल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. “जनतेने घाबरून जाण्याचं शून्य टक्के देखील कारण नाही. कारण दक्षिण अफ्रिकेत मृत्यू दर नाही. तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांचंही प्रमाण नाही,” असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. तसेच नागरिकांनी केवळ दोनच गोष्टींचं १०० टक्के पालन करावं, असं आवाहन केलं. “जनतेने कोविडच्या नियमांचं १०० टक्के पालन करावं आणि करोना विरोधी लसीकरण घ्या. या दोनच गोष्टी आहेत, त्या कुठल्याही परिस्थितीत न चुकता कराव्यात एवढीच माझी नम्रतेची विनंती महाराष्ट्राच्या जनतेला आहे,” असं आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी केलं.
राजेश टोपे म्हणाले, “ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण महाराष्ट्रात सापडला आहे. मागील ४-५ दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतील ज्या रूग्णावर कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरू होते तो रूग्ण ओमायक्रॉन बाधित निघाला आहे. असं असलं तरी घाबरण्याचं शून्य टक्के कारण नाही. कारण दक्षिण अफ्रिकेचा पूर्ण अभ्यास केला तरी तिथंही मृत्यू दर नाही. मोठ्या प्रमाणात रुग्णालयात रूग्ण दाखल होण्याचं प्रमाणही नाही. मात्र, या विषाणूचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात होतो. ओमायक्रॉन विषाणूची संसर्ग करण्याची क्षमता खूप आहे.”