
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात आज, शनिवारी १,८९५ पानांचे आरोपपत्र किल्ला कोर्टात दाखल करण्यात आले आहे. गोरेगावमधील कथित खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही प्रक्रिया केली आहे. सिंह यांच्या विरोधातील हे पहिलेच आरोपपत्र आहे. गोरेगाव खंडणी प्रकरणात परमबीर सिंह, सचिन वाझे, रियाझ भाटी, विनय सिंग, अल्पेश आणि चिंटू हे सहा आरोपी आहेत. या प्रकरणातील दोघे अद्याप फरार आहेत. त्यांच्या नावे अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. सिंह यांनी गेल्या आठवड्यात या प्रकरणी जबाब नोंदवला होता. तो जबाबही यात समाविष्ट करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्यावर एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. त्यातील ३ खंडणीचे, एक ॲट्रॉसिटी आणि अधिकाऱ्यांना धमकावले असल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.