संजय भुवड
महाड : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून संपावर आहे. हा संप शांतीपूर्वक तथा न्याय्य मार्गाने सुरू आहे. मात्र, संपकरी कर्मचाऱ्यांनी माघार घेऊन कामावर हजर व्हावे, यासाठी एसटी प्रशासनाकडून त्यांच्यावर निलंबन व बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तथापि, या कारवाई नंतरही बरेचसे कर्मचारी संपावर ठाम असल्याने या कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप संपकरी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. महाड आगारातील संपकरी कर्मचारी ज्या ठिकाणी ठिय्या मांडून आहेत, त्या एसटी स्थानकाच्या नव्या वास्तूमध्ये कचरा व घाण टाकून त्या ठिकाणाहून कर्मचाऱ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला गेल्याने संपकरी कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
एसटी महामंडाळचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून संपावर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी सुरुवातीचे काही दिवस आगाराच्या आवारात आपले आंदोलन सुरू ठेवले होते. मात्र, एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांना आगाराच्या आवारात बसण्यास मज्जाव केल्याने हे कर्मचारी आगारासमोरील मिळेल त्या जागेत बसून आंदोलन करत आहेत. महाड एसटी आगारातील संपकरी कर्मचारी एसटी महामंडळाच्या सुरू असलेल्या नवीन स्थानकाच्या जागेत गेल्या काही दिवसांपासून ठिय्या धरून आहेत.
शुक्रवार दि. ३ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत संपकरी कर्मचारी या ठिकाणी बसून होते. त्यानंतर ते आपापल्या घरी गेले. आज सकाळी हे कर्मचारी पुन्हा नव्या स्थानकाच्या इमारतीमध्ये आले असता, ज्या ठिकाणी त्यांनी ठिय्या मांडाला होता, त्या ठिकाणी कुणीतरी कचरा व घाण टाकून त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराने संपकरी कर्मचारी संतप्त झाले असून हा प्रकार प्रशासनाकडूनच केला गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एसटीच्या नव्या स्थानकाचे काम अद्याप ठेकेदाराकडून सुरू असून, ही वास्तू अद्याप एसटी महामंडळाच्या ताब्यात दिली गेलेली नाही. त्यामुळे या ठिकाणाहून आम्हाला हटवण्याचा अधिकार प्रशासनाला नाही, असेही या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
याआधीही झाला होता प्रयत्न
दरम्यान, यापूर्वीही पोलीस बळाचा वापर करून संपकरी कर्मचाऱ्यांना एसटी स्थानकाच्या नव्या वास्तूमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष चेतन उतेकर यांच्या मध्यस्थीनंतर त्या ठिकाणी बसण्यास संपकरी कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली, असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
प्रशासनाकडून कचरा टाकण्यात आलेला नाही : आगारप्रमुख
या संदर्भात आगार प्रमुख शिवाजी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, एसटी महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या आवारात थांबू देऊ नये, असे आदेश आहेत. मात्र, ज्या ठिकाणी हे संपकरी कर्मचारी बसत आहेत, त्या ठिकाणी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा कचरा टाकण्यात आला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.