नाशिक (प्रतिनिधी) : ‘‘समाजात अजूनही विज्ञानाने पाय रोवलेले नाहीत, याची पदोपदी जाणीव होते. समाजापर्यंत विज्ञान मनोरंजक पद्धतीने मांडण्याची गरज आहे. खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातला मूलभूत फरक अजून तथाकथित सुशिक्षितांना देखील कळत नाही, हे पाहून मन खिन्न होते’’, असे मत ज्येष्ठ वैज्ञानिक आणि नाशिकच्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. जयंत नारळीकर संमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत; परंतु त्यांचे अध्यक्षीय भाषण संमेलनात प्रसिद्ध करण्यात आले. त्यामध्ये त्यांनी विज्ञान आणि साहित्य यावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.
या भाषणात डॉ. नारळीकर यांनी मराठी साहित्यात विज्ञान साहित्य अल्प प्रमाणात असल्याबद्दल खंत व्यक्त केली. डॉ. नारळीकर म्हणतात, ‘मराठी साहित्याकडे पाहिले की, त्यात विज्ञान साहित्य किती अल्प प्रमाणात आहे ते दिसून येईल. विज्ञान कथालेखक केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आणि प्रतिष्ठित साहित्यिकांमध्ये विज्ञानाबद्दल (आदर असला तरी) एक प्रकारची भीती दिसून येते. विज्ञान म्हणजे आपल्या आकलनापलीकडले असा बहुतेक साहित्यिकांचा ग्रह झालेला असल्याने ते आपली प्रतिभा विज्ञानाच्या दिशेने चालवायला धजत नाहीत. अनेकदा वाचक किंवा श्रोते देखील आपल्याला वैज्ञानिक तथ्ये समजणारच नाहीत, असा ग्रह बाळगतात’.
विज्ञान समाजापर्यंत मनोरंजक पद्धतीने मांडण्याचे काम किती लोक करतात? असा प्रश्न उपस्थित करत डॉ. नारळीकर म्हणतात, ‘सुदैवाने असे लेखन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. काही वृत्तपत्रांत आठवड्याचा एक दिवस पानभर मजकूर विज्ञानाबद्दल असतो. काही नियतकालिकांत देखील विज्ञानविषयक माहिती सापडते. अजूनही समाजात विज्ञानाने पाय रोवलेले नाहीत, याची पदोपदी जाणीव होते.
कुसुमाग्रज नगरीत रंगलेल्या या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरुवात आज भव्य ग्रंथ दिंडीने करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्ष तथा कृषिमंत्री दादाजी भुसे व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते दिंडींचे पूजन करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून सुरू झालेल्या दिंडीचे नाशिककरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
साहित्य संमेलनाचा शुभारंभ करणाऱ्या या ग्रंथदिंडीच्या सोहळ्यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे उपाध्यक्ष तथा संमेलनाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार पंकज भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी नितीन मुडांवरे, संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, निमंत्रक-प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगांवकर, संमेलनाच्या सर्व समितींचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर, सर डॉ. मो. स. गोसावी, प्राचार्य प्रशांत पाटील यांच्यासह लेखक, कवी, साहित्यिक, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक व साहित्यप्रेमींनी उपस्थिती लावली होती.
यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले, लेझीम पथक, वारकरी मंडळी व ढोलताशांच्या गजरात ग्रंथ दिंडीला सुरूवात करण्यात आली. ग्रंथदिंडीच्या पालखीमध्ये भगवतगीता, ज्ञानेश्वरी व कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा ठेवण्यात आली होती. यावेळी नाशिक पोलीस विभागामार्फत पोलीस व जनता यांच्यातील सुसंवाद वाढवा यासाठी जनजागृतीपर काढण्यात आलेल्या रॅलीतून महाराष्ट्र राज्य पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता या मासिकाची माहिती देण्यात आली.
जयंत नारळीकरांवर निशाणा
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अध्यक्ष जयंत नारळीकर अनुपस्थित राहिल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ‘जयंत नारळीकर यांची प्रकृती ठीक नाही हे मी समजू शकतो. पण जर ते किमान एक तास जरी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते तर सर्व रसिकांना आनंद झाला असता. या कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. ‘शेकडो लोक आपल्याला पाहायला आले ही बाब लक्षात ठेऊन ते आले असते तर रसिकांना आनंदच झाला असता. जर भविष्यात अशी परिस्थिती ओढावली तरी दुसरा अध्यक्ष निवडण्यात यावा, अशी तरतूद मंडळाच्या घटनेत असावी,’ असे मत ठाले पाटील यांनी व्यक्त केलं.
विद्यमान, मावळते संमेलनाध्यक्ष अनुपस्थित
कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या ‘गर्जा जयजयकार’ या गीताने उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, गीतकार जावेद अख्तर आणि साहित्यिक विश्वास पाटील हे कार्यक्रमाला उपस्थित होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर आणि मावळत्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे दोघे प्रकृती अस्वस्थ्यामुळे अनुपस्थित होते.