Monday, July 15, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखपर्यावरण आणि आम्ही सर्वजण!

पर्यावरण आणि आम्ही सर्वजण!

क्षितिजा देव
आपण निसर्गाबद्दल बरेचदा तक्रार करत असतो. वेळी-अवेळी पडणारा पाऊस, त्यामुळे होणारं पिकांचं नुकसान, त्यातून येणारी महागाई यामुळे आपण त्रासून जातो. पण याला जबाबदार कोण आहे याचा विचार आपण कधी करतो का? पृथ्वीच्या अगदी सुरुवातीपासूनच माणसाने निसर्गाकडून आणि वृक्षांकडून भरपूर काही घेतलं. आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून भरपूर प्रगतीही केली. पण प्रगती करता करता, त्याच वेळी निसर्गावर आक्रमण करून त्याचा समतोल पार बिघडवून टाकला. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कारखान्यांमधून होणारं हवेचं प्रदूषण, नदीच्या पाण्यात मिसळल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारं जलप्रदूषण, प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणारं प्रदूषण असे प्रदूषणाचे अनेक प्रश्न निर्माण झाले. विकासाच्या घोडदौडीमध्ये भूप्रदेश कमी पडतो म्हणून जंगलांची जागा बळकावली गेली. त्यासाठी आपल्यावर अनंत उपकार करणाऱ्या आणि उपयोगी पडणाऱ्या झाडांची बेसुमार कत्तल केली गेली. त्यामुळे साहजिकच जागतिक तापमान वाढलं आणि निसर्गाचा समतोल ढासळला. मग माणूस स्वतः दुष्काळ, महागाई यांचा बळी ठरला. त्याशिवाय त्सुनामी, सागरी वादळं, भूकंप, महापूर अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना आमंत्रणच दिलं गेलं.

पहिल्या महायुद्धानंतर मानवाने निसर्गावर केलेल्या अत्याचाराचे दुष्परिणाम दिसू लागले. मग पर्यावरणशास्त्राचा अभ्यास होऊ लागला. आपल्याभोवतीच्या जैविक आणि अजैविक अशा सृष्टीमध्ये माणसांबरोबरच पशू-पक्षी, जलचर, वृक्ष-वनस्पती तसंच पाऊस, वारा, खडक, माती यांसारखे अनेक घटक समाविष्ट आहेत. या सगळ्यांचाच परस्परसंबंध असतो. त्यातूनच निसर्गचक्र सुरळीत चालू राहतं. पण निसर्गावरच्या आक्रमणामुळे हे चक्र बिघडून गेलं आहे आणि त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे. त्याचे फार गंभीर परिणाम पुढे माणसाला भोगावे लागतील, हे तेव्हा शास्त्रज्ञांना जाणवलं. शिवाय या ढासळण्याचा वेगही जास्त होता. शासन खडबडून जागं झालं. पर्यावरण संरक्षणाची आणि संवर्धनासाठी तातडीनं उपाययोजना सुरू झाल्या. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्था स्थापन केल्या गेल्या. एकाच वेळी माणसाचा विकासही साधला गेला पाहिजे, पण त्याच वेळेला पर्यावरणाचा समतोल ढासळू नये, अशी दुहेरी जबाबदारी शासनावर पडली. समाजातही याबाबत जागृती सुरू झाली. वृक्षांचं महत्त्व काय आहे हे खरं पाहता प्रत्येक माणूस अगदी प्राथमिक शाळेतच विज्ञानात शिकलेला असतो. वृक्ष हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर प्रदान करतात. पर्यायानं वातावरणातली हवा स्वच्छ ठेवायला आणि पाऊस पडायलाही कारणीभूत ठरतात.

खरं तर अगदी पुराणकाळात देवदेवतांनाही वृक्ष फार प्रिय होते. श्रीविष्णूला तुळस आवडते, गणपतीला दुर्वा तर दत्ताला औदुंबर प्रिय आहे हे आपण जाणतोच. श्रीकृष्णाला तर वनमाळी, कुंजबिहारी असं संबोधलं आहे. इतकंच नव्हे, तर गीतेच्या शेवटीही श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना म्हटलं आहे की, निसर्गाचा नियम तोडणं आणि त्याच्या विरोधात जाणं, हा भविष्यकाळात मनुष्यमात्राचा गुन्हा ठरेल. त्याच्या दैवी नजरेला बहुधा कलियुगातला हा वृक्षसंहार दिसला असावा. आपले चारही वेद, अठरा पुराणं यातदेखील वृक्षांचं महत्त्व सांगितलं आहे. आपले ज्ञानाचे सागर-साधुसंत. ते सुद्धा वृक्षांचं महत्त्व जाणून होते. म्हणूनच तर संत तुकारामसुद्धा आपल्या अभंगात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असं म्हणतात. एकूणच प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरणाला अतिशय महत्त्व दिलेलं दिसतं. पण आपण मात्र विकासाच्या हव्यासापायी वृक्षांचं महत्त्व विसरलेले दिसतो.

वाढती लोकसंख्या हे सुद्धा पर्यावरण बिघडण्यामागील मोठं कारण ठरत आहे, कारण माणसांची संख्या जेवढी जास्त, तेवढ्याच प्रमाणात नवीन घरं बांधली जातात. नवीन रस्ते, दळणवळणाचे मार्ग, शाळा, ऑफिसेस अशी सगळीच बांधकामं वाढतात. त्यासाठी भूप्रदेश कमी पडला की, जंगलांची जागा बळकावली जाते आणि झाडं तोडणं अपरिहार्य होतं. शिवाय जेवढी माणसं जास्त, तेवढा ऑक्सिजनही जास्त वापरला जातो, वाहनंही जास्त वापरली जातात आणि वायुप्रदूषणही जास्त वाढतं.

आदर्श विचार लक्षात घेता, लोकसंख्येबरोबर झाडांचीही संख्या वाढायला हवी, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. उलट, झाडांची संख्या कमी होताना दिसते. शासनदेखील पर्यावरणरक्षण आणि संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील असतं. काही वर्षांपूर्वी हरित सेना हा प्रकल्प राबवला. त्यात सगळ्या जनतेनं अत्यंत उत्साहानं सहभागी होऊन वेगवेगळ्या ठिकाणी एकूण २ कोटी ८३ लाख वृक्षांची लागवड केली होती. शासनही अशा प्रकल्पांना आणि पर्यावरण संवर्धन करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच सन्मानित करून प्रोत्साहन देत असतं. नुकतेच हजारो झाडे लावणाऱ्या तुलसी गौडा यांना आणि निरनिराळी बी-बियाणे जोपासणाऱ्या, संवर्धन करणाऱ्या बीजमाता राहिबाई यांना शासनाने पद्मश्री हा बहुमानाचा पुरस्कार देऊन सन्मान केला.

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या या संस्था अनेक जबाबदाऱ्या पार पाडतात. त्यात सरोवराचं संवर्धन, नद्यांचं प्रदूषण थांबवणं, धरण बांधणं, पाणी शुद्धीकरण करण्याची यंत्रणा उभारणं, वन्यजीवांचं संरक्षण करणं, गिधाडांसारख्या नामशेष होऊ पाहणाऱ्या प्रजातींचं रक्षण करणं, हे उपक्रम समाविष्ट होतात. तसंच कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून विल्हेवाट लावणं, कारखान्यांची धुरांडी, वाहनातून होणारं घातक वायुप्रदूषण यांची तपासणी करून उपाय शोधणं, अशी महत्त्वाची कामंही ते पार पाडत असतात.

छोट्याशा खेडेगावामधून, तर संपूर्ण गावाला वेढलं जाईल, असं वृक्षांचं कुंपण तयार करण्यासाठी रोपांची लागवड चालू असते. त्याचप्रमाणे आता शहरातही प्रत्येक वसाहतीभोवती किंवा दोन इमारतींच्या मध्यभागी, अंगणात, इमारतीच्या गच्चीवर वेगवेगळी सुंदर झाडं लावण्याचा छंद लोक आवडीने आणि प्रयत्नपूर्वक जोपासू लागले आहेत. सुशोभित फुलबाग आणि उपयुक्त भाजीपाला घराच्या अंगणातच फुलवणं हा छंद बनला आहे. एक जागरूक नागरिक म्हणून आपण काय सहकार्य करू शकतो, असा विचार मनात येतो तेव्हा अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत हे लक्षात येतं. घराच्या आसपासच्या जागेत महिन्यातून एकदा, निदान स्वतःच्या वाढदिवशी एखादं रोपटं लावून, खतपाणी घालून वाढवणं यातला आनंद घेऊ शकतो. प्लास्टिकचा वापर तर आपण नक्कीच बंद करू शकतो. तसंही कागदी पिशव्या वापरणं आता सर्रास सुरू झालं आहे. अन्न आणि भाजीपाला प्लास्टिकमध्ये न ठेवता अल्युमिनियमचा पातळ पापुद्रा वापरता येईल. इंधन आणि वीज वाचवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमी करता येईल. आठवड्यातून एक दिवस, ठरवून आपण वाहन बंद ठेवलं, तर किती छान होईल. कल्पना करा, जगभर सगळ्यांनी हवेवर किंवा विजेवर चालणारी वाहनं वापरली, तर इंधनाची केवढी तरी बचत होईल आणि वायू प्रदूषणालाही मोठ्या प्रमाणावर आळा बसेल.

पर्यावरणाच्या समतोलासाठी आपण निसर्गाबाबतच्या वाईट सवयीही सोडून द्यायची गरज आहे. शक्य झालं तर पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धनाचं काम करणाऱ्या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचं सभासद होऊन त्यांच्या विविध मोहिमांमध्ये सहभागी होऊन जनजागृती करणंही अशक्य नाही. यातून आपल्या देशावरचं आणि मानवजातीवरचं प्रेम आणि आपली सजगताच दिसणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -