वृषाली आठल्ये, मुंबई ग्राहक पंचायत
हिंदी सिनेमा, धारावाहिक यातील अभिनेते आणि खेळाडू यांचा समाजावर मोठा प्रभाव असतो. असे सेलिब्रिटी एखाद्या उत्पादनाची जाहिरात करतात तेव्हा तीच उत्पादने वापरण्याचा मोह सर्वांना होतो. अशा जाहिरातीत काम करणे हा केवळ त्यांच्या व्यवसायाचा भाग असतो.
सेलिब्रिटींचा उत्पादनांशी देणे-घेणे नसणे हा सर्वसाधारण नियम. पण या नियमाला अपवाद म्हणून पोर्तुगालच्या जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोचं नाव घेता येईल. अलीकडेच झालेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान त्याची पत्रकारांसमोर मुलाखत होणार होती. तो स्टेजवर आला असताना त्याच्या समोरील टेबलावर स्पर्धा पुरस्कृत करणाऱ्या कंपनीच्या शीतपेयाच्या दोन बाटल्या ठेवलेल्या दिसल्या. त्याने लगेचच त्या बाजूला ठेवल्या व म्हणाला की, मी शीतपेय पीत नाही, मी फक्त साधे पाणी पितो. ‘आपल्या आरोग्याला जे चांगले आहे, तेच प्या,’ हा महत्त्वाचा संदेश त्याने या कृतीतून संपूर्ण जगाला दिला. शीतपेयामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची त्याने जगाला आणि त्याच्या चाहत्यांना जाणीव करून देताना स्वतःच्या नुकसानाचा क्षणभरही विचार केला नाही. रोनाल्डोचे सोशल मीडियावर ४० कोटी चाहते असल्याने त्याच्या या एका कृतीमुळे जगभरात सर्वच क्षेत्रांत तीव्र पडसाद उमटले. त्या शीतपेय कंपनीच्या शेअर्सचे भाव १.६ टक्क्यांनी गडगडले. अवघ्या तासाभरात बाजारमूल्य ४ अब्ज डॉलर्सने घसरून २३८ अब्ज डॉलर्सवर आले. शिवाय त्या कंपनीच्या विक्रीवरही विपरित परिणाम झाला.
केवळ रोनाल्डोच नाही, तर इटलीचा मॅन्युएल लाकाटेल्ली, फ्रान्सचा पॉल पोग्बा यांनीही रोनाल्डोप्रमाणेच पुरस्कर्त्यांनी टेबलवर ठेवलेल्या शीतपेयांच्या बाटल्या बाजूला करून मगच पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेले. या काही घटनांमुळे शीतपेये आणि त्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम हा विषय चर्चेत आला आहे. पण या दुष्परिणामांचा कोणी गांभीर्याने विचार करत नाही. त्यात मोठ्या प्रमाणावर पाण्यात विरघवळलेली साखर आणि इतर रासायनिक घटक असतात, आजच्या जमान्यातील नंबर वन ‘व्हॅल्यू ॲडेड’ उत्पादन म्हणजे सॉफ्ट ड्रिंक म्हणावे लागेल, जे आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांचे थेट नुकसान करतात. अतिरिक्त साखर हृदयाशी निगडित आजार, कर्करोग आणि मधुमेहासारख्या आजारांना आमंत्रित करते. हाडे ठिसूळ होणे, स्मरणशक्ती कमी होणे, लठ्ठपणा, पचनशक्ती कमी होणे, अशा अनेक दुष्परिणामांना लहान वयातच सामोरे जावे लागते. त्यातील अतिरिक्त आम्लामुळे दात खराब होतात. असे एक ना दोन, अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात.
शरीरावर होणारे दुष्परिणाम पाहून काही खेळाडूंनी शीतपेय कंपन्यांची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली याने पेप्सीबरोबर केलेले सहा वर्षांचे कंत्राट रद्द केले व पुढे त्याची जाहिरात करण्यास नकार दिला. बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांनीही सन २०००मध्ये अशाच एका कंपनीचा जाहिरातीचा प्रस्ताव धुडकावला होता. हे खेळाडू खऱ्या अर्थाने आदर्श ठरतात.
हे सर्व पाहता शीतपेये पिणे योग्य नाही. पण ते नाही तर काय प्यावे हा प्रश्न उरतोच. त्यावरचे उत्तर सोपे आहे. आपला निसर्ग आपल्यावर कित्येक उत्पादनांची उधळण करत असतो. सहज मिळाल्याने त्याची आपण कदर करत नाही. फळांचे रस, नारळाचे पाणी अशी कितीतरी ‘हेल्दी’ उत्पादने आपण सेवन केली पाहिजेत. सोया मिल्क, स्मूदीज वगैरे पेये अत्यंत आरोग्यदायी आहेत. त्याचाही जरूर विचार झाला पाहिजे.
शीतपेये सेवन केल्याने शारीरिक हानीबरोबरच निसर्गाची हानीही करण्यास आपला हातभार लागतो. ही उत्पादने कारखान्यापासून गोदामे व विक्रीच्या दुकानांपर्यंत नेण्यासाठी इंधनाचा वापर होतो. या प्रवासात इंधनाच्या ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साइड आणि इतर प्रदूषक वायू हवेत मिसळत असतात. त्यामुळे हवेचे प्रदूषण वाढण्यास मदत होते. ही उत्पादने प्लास्टिकच्या बाटल्यांत भरून विकली जातात. त्यामुळेही प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो. यांना जाळून नष्ट करण्यासाठी परत इंधनाचा वापर होतो. शीतपेय उत्पादनासाठी नद्यांच्या, विहिरींच्या पाण्याचा बेसुमार वापर केला जातो. त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. शेतीला पाणी पुरेनासे होऊन शेती उत्पन्नावर वाईट परिणाम होतो. २०१७ मध्ये तामिळनाडू राज्यातील शेतकऱ्यांनी याबाबत मोठा आवाज उठवला होता आणि शीतपेयांवर बहिष्कार टाकला होता. ही आठवण ताजी आहे.
शीतपेय म्हणजे विजय, आनंदोत्सव, भीतीवर मात इत्यादी समीकरणे जाहिरातींच्या माध्यमातून दृढ केली गेली आहेत. या जाहिरातीतील साहसी कारनामे खरी नसतात. त्याचे अनुकरण कोणीही करू नये, हे वाक्य मात्र अत्यंत बारीक अक्षरात लिहिलेले असते. त्यामुळे अपघात होण्याच्या शक्यतेकडे कोणाचेही फारसे लक्ष जात नाही.
एकंदरित विचार करता ही सॉफ्ट ड्रिंक्स केवळ नावापुरतीच सॉफ्ट, पण त्यांच्यामुळे होणारी हानी मात्र हार्ड. तेव्हा आपला जुना संस्कृत श्लोक ‘सर्वे भवन्तु सुखिनः ꠰ सर्वे: सन्तु निरामया:’ लक्षात असू द्या.
[email protected]