प्रशांत जोशी
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत व्यवसाय करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांविरोधात रिक्षा प्रवाशी आवाज उठवत असून या बाबतची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. कोरोना काळात दबलेल्या आवाजातील हेच रिक्षाचालक आता रिक्षा प्रवाशांची लूट करत आहेत.
शेअर भाडेतत्त्वावर आता तीन-तीन प्रवासी रिक्षात बसवून त्यांच्याकडून दुपटीने भाडे घेत आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाचे नियम धाब्यावर बसवून त्यांचा रिक्षा व्यवसाय सुरू आहे. याकडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक नियंत्रण पोलीस प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे, अशी विचारणा प्रवासी नागरिक करीत आहेत.
सततच्या रिक्षा प्रवासात येणाऱ्या वाईट अनुभवामुळे रिक्षा प्रवाशी त्यांच्या समस्या आता सोशल मीडियावर कथन करू लागले आहेत.
याबाबत काही रिक्षा चालकांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
तर नाव न छापण्याच्या बोलीवर एक प्रवासी म्हणाले, डोंबिवलीत वाहतूक नियम नाही, रिक्षाचे नियम नाही, नियम अटी कोणी पाळीत नाही त्यामुळे हा विषय वाहतूक नियंत्रण पोलिसांपर्यंत जात नाही.
याबाबत लाल बावटा युनियनचे अध्यक्ष काळू कोमस्कर यांनी सांगितले की, प्रवाशांची लूटमार होत आहे ते काही प्रमाणात खरे आहे. याला सर्वस्वी जबाबदार आरटीओ आणि वाहतूक शाखा आहे. मुख्य स्थानकांवर जास्तीचे पैसे घेतले जात नसले तरी काही ठिकाणी प्रवाशांची फसवणूक होत आहे. रिक्षा दरपत्रकाबाबत सर्व्हे सहा महिने झाले तरी पूर्ण होत नाही. त्यामध्ये भरपूर दुरुस्त्या आणि त्रुटी आहेत. नुकतीच याविषयी बैठक झाली असून त्यावर भरपूर हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.