मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि न्यू्झीलंड यांच्यात दुसरा आणि अंतिम कसोटी सामना शुक्रवारपासून (३ डिसेंबर) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. गेल्या तीन दिवसांपासूनची रिपरिप पाहता या सामन्यावर पावसाचे सावट आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला तरच खेळ शक्य आहे. वातावरणाच्या बदलासह यजमानांसमोर परिपूर्ण संघनिवडीचे आव्हान आहे.
राज्यभरात सुरू असलेला पाऊस मंगळवार रात्रीपासून मुंबईत अवतरला. सलग तीन दिवस पडलेल्या पावसाने कसोटी सामना विना व्यत्यय खेळला जाण्याची शक्यता नाही. दक्षिण मुंबईतही कधी तुरळक तर कधी सरींनी येणाऱ्या पावसामुळे वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली आहे. मैदान (आउटफिल्ड) ओले नसले तरी शुक्रवारी स्वच्छ सूर्यप्रकाश पडला तरच सामना सुरू होईल, असे एमसीएमचे क्युरेटर्सचे म्हणणे आहे. सामन्यासाठी नियुक्त अंपायर्स पहिल्या दिवशी सकाळी मैदानाची पाहणी करतील. तसेच प्रकाश व्यवस्थेची चाचणी घेतील. त्यानंतर अंतिम निर्णय घेतील. रिमझिम पावसामुळे दोन्ही संघांचे क्रिकेटपटू मैदानावर सराव करू शकले नाही. भारताच्या क्रिकेटपटूंनी इनडोअर सरावावर भर दिला. पाहुण्या क्रिकेटपटूंनी बुधवारी जिमला प्राधान्य दिले. त्यानंतर गुरुवारी थोडा सराव केला.
कानपूरमध्ये झालेली पहिली कसोटी अनिर्णीत राहिली तरी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारताचा नैतिक विजय झाला. ऑफस्पिनर आर. अश्विनसह डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या अचूक आणि प्रभावी माऱ्यासमोर न्यूझीलंडची मधली फळी कोलमडली तरी तळातील फलंदाजांनी पराभव टाळला. विजयाने हुलकावणी दिली तरी उंचावलेल्या सांघिक कामगिरीमुळे यजमान संघाचे मनोबल वाढले आहे. त्याचा फायदा मुंबई कसोटीत होईल. नियोजित कर्णधार विराटच्या पुनरागमनामुळे भारतासमोर परिपूर्ण संघ निवडण्याचे मोठे आव्हान आहे. मुंबईकर श्रेयस अय्यरने धडाकेबाज कसोटी पदार्पण केले. आघाडीच्या फळीत त्याला सलामीवीर शुबमन गिल, कर्णधार अजिंक्य रहाणे तसेच मधल्या फळीत अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि आर. अश्विनचे चांगले सहकार्य लाभले. दुसऱ्या डावात यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहासह अक्षर पटेलने खेळपट्टीवर थांबण्याचे धाडस दाखवले. मात्र, अनुभवी चेतेश्वर पुजारासह मयांक अग्रवालने निराशा केली. अय्यरने संघातील स्थान पक्के केल्याने कोहलीच्या कमबॅकमुळे या दोघांपैकी एकाला संघाबाहेर बसावे लागेल.
आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या फिरकी त्रिकुटाने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व राखले आहे. मात्र, इशांत शर्मा आणि उमेश यादव या वेगवान दुकलीने निराशा केली आहे. यादवला दोन विकेट मिळाल्या. इशांतला एकही विकेट घेता आलेली नाही.
वेळ : स. ९.३० वा.
भारत : विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), केएस भरत (राखीव यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, विल यंग, रॉस टेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), काइल जॅमिसन, टिम साउदी, नील वॅग्नर, अजाझ पटेल, विल सॉमरविल, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर.
पाच वर्षांनंतर वानखेडेवर कसोटी
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर तब्बल पाच वर्षांनी वानखेडे स्टेडियमवर कसोटी सामना रंगणार आहे. यापूर्वी, ८ ते १२ डिसेंबर २०१६ या कालावधीत भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना झाला होता. या यजमानांनी एक डाव आणि ३६ धावांनी विजय मिळवला.
वानखेडेवर आजवर २५ कसोटी खेळल्या गेल्या असून भारताने ११ सामने जिंकले आहेत. सात सामन्यांत पराभव झाला तर तितकेच सामने अनिर्णीत (ड्रॉ) राहिले. जानेवारी १९७५मध्ये वानखेडे स्टेडियमवर भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्यात यजमान संघाला २०१ धावांनी पराभव पाहावा लागला.
१९७६मध्ये न्यूझीलंडला १६२ धावांनी हरवत भारताने वानखेडेवर पहिला विजय नोंदवला. त्यात विक्रमादित्य सुनील गावस्कर यांची (११९ धावा) शतकी खेळी निर्णायक ठरली. न्यूझीलंड संघ मुंबईत शेवटची कसोटी १९८८मध्ये खेळला. त्यात त्यानी यजमानांवर १३६ धावांनी मात केली.
पहिल्या कसोटीतील विश्रांतीनंतर नियोजित कर्णधार विराट कोहली पुन्हा संघात परतला आहे. मागील सामन्यात (८ ते १२ डिसेंबर २०१६, वि. इंग्लंड) वानखेडेवर त्याने २३५ धावांची चमकदार खेळी केली होती. या मॅचमध्ये भारताने डावाने विजय मिळवला.
संघ व्यवस्थापन रहाणे-पुजाराच्या पाठिशी : पारस म्हांब्रे
रहाणे-पुजाराच्या कामगिरीबाबत कोणतीही चर्चा झाली नसून, संघ त्यांच्या पाठीशी आहे, असे स्पष्टीकरण गोलंदाजीचे प्रशिक्षक पारस म्हांब्रे दिले आहे.
‘दोघांकडे कसोटी क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे सूर गवसण्यापासून ते एका डावाच्या अंतरावर आहेत. संघ म्हणून आम्ही सर्व जण दोघांच्या पाठीशी आहोत. ते पुरेसे क्रिकेट खेळले असल्यामुळे त्यांना अपेक्षांची जाणीव आहे,’अशा शब्दांत म्हांब्रे यांनी रहाणे-पुजाराचे समर्थन केले.
संघनिवडीच्या पेचाबाबत, अशी समस्या असणे चांगले लक्षण आहे, असे मला वाटते. भारतीय क्रिकेटमधील गुणवत्तेवर बोलण्यासारखे खूप आहे. उदयोन्मुख युवा क्रिकेटपटूंना योग्य संधी मिळायला हवी. श्रेयससारखा फलंदाज पदार्पणातच शतक आणि अर्धशतकासह लक्ष वेधतो; परंतु सामन्याच्या खेळपट्टीनुसार संघरचना करावी लागते, असे म्हांब्रे म्हणाले.
साहाचा निर्णय सामन्याआधी
यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा खेळण्याबाबतचा निर्णय सामन्याआधी घेऊ, असे म्हांब्रे यांनी सांगितले. फिजिओकडून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार विराट कोहली सातत्याने साहाच्या तंदुरुस्तीचा आढावा घेत आहेत,’’ असे म्हांब्रे यांनी म्हटले आहे. कानपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात साहाने नाबाद ६१ धावांची झुंजार खेळी साकारली होती; परंतु मानेचा स्नायू दुखावल्याने पाचव्या दिवशी तो यष्टिरक्षणासाठी मैदानावर उतरू शकला नाही. त्याच्याऐवजी राखीव विकेटकीपर के. एस. भरतने यष्टिरक्षण केले.