नाशिक: भाषा एकमेकांना जवळ आणते. मात्र हीच भाषा भिंतसुध्दा निर्माण करते असं मत ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गीतकार,लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं आहे.
नाशिकमध्ये संपन्न होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालामध्ये जावेद अख्तर यांनी आपली परखड मत मांडली. लेखक जनतेचं प्रबोधन करतो. मात्र प्रबोधन करताना त्याला विरोधही सहन करावा लागतो. साहित्यकानं त्याच्या साहित्याशी आणि देशाशी प्रमाणिक राहावं. साहित्यकानं कुठल्याही पक्षाचा प्रवक्त होता कामा नये असंही ते म्हणाले.
आजपासून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली खरी मात्र संमेलनाध्यक्षांविनाच साहित्य संमेलनाला सुरुवात झाल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटिल यांनी खंत व्यक्त केली आहे. संमेलनाध्यक्ष डॉ जयंत नारळीकर अनुपस्थित असल्यामुळे ठाले पाटिल यांनी चालता बोलता संमेलनाध्यक्ष निवडा अशी भावना यावेळी व्यक्त केली.
जयंत नारळीकर यांची प्रकृती ठीक नाही हे समजू शकतो पण जर ते किमान एक तास जरी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते तर सर्व रसिकांना आनंद झाला असता. या कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. शेकडो लोक आपल्याला पाहायला आले ही बाब लक्षात ठेऊन ते आले असते तर रसिकांना आनंदच झाला असता. जर भविष्यात अशी परिस्थिती ओढावली तरी दुसरा अध्यक्ष निवडण्यात यावा अशी तरतूद मंडळाच्या घटनेत असावी असे मत कौतिकराव ठाले पाटिल यांनी व्यक्त केलं आहे.