सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकणात ऐन डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका वाढलेला असायचा. पण यंदा मात्र सारे गणित बिघडलेले दिसत आहे. सिंधुदुर्गात बुधवारी सायंकाळपासून गुरुवारी उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. या पावसामुळे काही भागांत ओहोळ पुन्हा तुडुंब भरले होते, तर शेतमळेही पाण्याने भरून गेल्याने भातकापणीनंतर भाजीपाल्याचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची शेती कुजली आहे. गेले पंधरा दिवस जिल्ह्यात या अवकाळी पावसाची प्रत्येक दिवशी हजेरी असतेच. ढगाळ वातावरण आणि पावसाची वाढलेली धार यामुळे देवगड हापूसबरोबरच, काजू, फणस, रतांबा या पिकांच्या हंगामावर या अवकाळी पावसामुळे ‘अवकळा’ आली आहे. सिंधुदुर्गातील अनेक कुटुंबांचे अर्थकारणच या बागायतींवर अवलंबून आहे. आता हे अर्थकारणच बदललेल्या निसर्गचक्राने कोलमडले आहे. कोकणाला अवकाळी पावसाने झोडपल्याने त्याचा सर्वात मोठा फटका हापूस आंबा पिकाला बसला आहे. पावसामुळे आलेला मोहोर गळून गेला आहे, तर आलेल्या आंबा पिकावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी तीन ते चार महिन्यांचा आंबा सीझन फक्त दोन महिन्यांवर येणार असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे.
कोकणात अनेक ठिकाणी गेल्या १५ दिवसांपासून पावसाचे प्रमाण कायम असल्याने त्याचा प्रचंड मोठा फटका हापूस आंबा पिकावर झाला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तीन जिल्ह्यांतून हापूस आंबा एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होत असतो. फेब्रुवारी महिन्यात आंब्याची आवक सुरू झाल्यानंतर मार्च, एप्रिल, मे महिन्यात आंब्याच्या पेट्यांनी एपीएमसी भरलेली असते. मार्चमध्ये दिवसाला १० हजार पेट्या आवक होणाऱ्या हापूस आंब्याची मे महिन्यात दिवसाला १ लाख पेट्यांच्या वर आवक जात असते. त्यामुळे फेब्रुवारी ते मे असे चार महिने हापूस आंब्याची चव सर्वसामान्यांना चाखता येते. यावेळी मात्र, कोकणात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचा मोहोर गळू लागल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे.
फेब्रुवारी, मार्च महिन्यात हापूस आंब्याला मार्केटमध्ये चांगला दर मिळतो. त्यामुळे कोकणातील शेतकरी या सुरुवातीच्या दोन महिन्यांत आपले आंबा पीक कसे मार्केटला दाखल होईल याची काळजी घेत असतात. त्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पिकाला मोहोर आणत, फेब्रुवारी, मार्चमध्ये ते फळं काढतात. गेल्या १५ दिवसांपासून कोकणात पाऊस पडत असल्याने आलेला मोहोर पूर्णपणे गळू लागल्याने फेब्रुवारी, मार्चमध्ये येणारा हापूस आंबा नष्ट झाला आहे. त्याचबरोबर ज्या झाडांवर फळधारणा झाली आहे, त्यावर पावसाचे पाणी पडल्याने त्याला काळे डाग पडले आहेत किंवा पावसाने थेट कमजोर होऊन फळ जमिनीवर पडू लागले आहे. शेतकऱ्यांनी केलेली फवारणी वाया गेली असल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. यापुढे झाडाला लागणाऱ्या मोहोरा मुळे एप्रिल , मे महिन्यात आंबा पिक बाजारात दाखल होईल. सर्व ठिकाणावरून आवक एपीएमसीमध्ये झाल्यास दर कोसळून शेतकरी वर्गाला उत्पादन खर्च काढणे जिकीरीचे जाणार असल्याचे एपीएमसी मधील घाऊक व्यापारी असलेले संजय पानसरे यांनी सांगितले.
सागरी पर्यटनाला ‘ब्रेक’
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र-कोकण किनारपट्टीवर पावसाची दमदार बरसात सुरू आहे. सोबत वाऱ्यांची गतीही वाढली आहे. समुद्रात लाटांचा जोर वाढल्याने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून किल्ले सिंधुदुर्ग दर्शन प्रवासी होडी वाहतूक गुरुवार सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहे. पाऊस व वारे यामुळे मालवण किनारपट्टीवरील वॉटर स्पोर्ट्स आणि अन्य सागरी पर्यटनही बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे मालवणात आलेल्या पर्यटकांना किनाऱ्यावरूनच किल्ले दर्शन व पर्यटनाचा आंनद घ्यावा लागत आहे. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून छोट्या प्रवासी होड्या (नौका), मासेमारी बोटी या कोळंब खाडी पात्रात सुरक्षित स्थळी उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत, तर मोठ्या मासेमारी नौकांनी सुरक्षित बंदरांचा आसरा घेतला आहे. अवकाळी पावसाचा मोठा परिणाम मालवणच्या सागरी पर्यटन व्यवसायावर झाला आहे. वारे व पावसाचा मासेमारी व्यवसायावरही परिणाम झाला आहे. समुद्री वातावरण खराब आल्यामुळे मासेमारी नौका सुरक्षित बंदरात आश्रयाला आहेत. त्यामुळे मासेमारी व्यवसायही ठप्प झाला आहे. एकूणच मच्छीमार व पर्यटन व्यावसायिक यांचे मोठे नुकसान झाले आहे.