बंगळूरु : कर्नाटक सरकारने ‘ओमायक्रॉन’ रुग्ण सापडल्याची बाब गांभीर्याने घेतली असून आधीच्या कोविड नियमांत बदल करत नवीन गाइडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. सध्या लॉकडाऊनसारखे कोणतेही कठोर पाऊल उचलण्यात आले नसले तरी काही बाबतीत नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. राज्यात येणाऱ्या सर्व विमान प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येणार आहे. त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली तरच त्यांना पुढचा प्रवास करता येणार आहे.
राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव, समारंभ आयोजित करण्यास १५ जानेवारीपर्यंत मनाई असेल. कोविडवरील दोन्ही लस घेतल्या आहेत अशाच व्यक्तींना आता मॉल, थीएटर, सिनेमागृह येथे प्रवेश दिला जाईल. सभा, बैठका, कोणतेही समारंभ, संमेलनं यात जास्तीत जास्त ५०० लोक उपस्थित राहू शकतात. जागेच्या क्षमतेनुसार ही संख्या मर्यादा असेल, असे अशोक यांनी सांगितले.
मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालक सोबत जाणार असतील तर त्यांचे पूर्ण लसीकरण झालेले असावे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कर्नाटकमध्ये ‘ओमायक्रॉन’चे जे दोन रुग्ण आढळले त्यापैकी एक रुग्ण दक्षिण आफ्रिकेचा नागरिक होता. तो माघारी गेला आहे. तर दुसरा रुग्ण स्थानिक आहे. त्याची प्रकृती आता उत्तम असून त्याच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या सर्वांचे नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.