कल्याण (वार्ताहर): तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि पालघर तायक्वांदो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विरार येथील ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट येथे सुरू झालेल्या ३३व्या स्पॅरिंग व नवव्या पुमसे राज्यस्तरीय सीनियर तायक्वांदो स्पर्धेत पहिल्या दिवशी पूमसे स्पर्धेमध्ये ठाण्याच्या वसुंधरा चेडे आणि आदर्श राजकर यांनी सुवर्णपदक व ६० वर्षांवरील गटात कौशिक गवालियाने रौप्य तर मुंबईच्या गौरव करगुटकरने ४० वर्षावरील गटात रौप्यपदक पटकावले.
आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार हितेंद्र ठाकूर, तायक्वांदो संघटनेचे उपाध्यक्ष अनिल झोडगे, महासचिव संदीप ओंबासे व मिलिंद पाठारे, टेक्निकल कमिटीचे भास्कर करकेरा, सुभाष पाटील, प्रवीण बोरसे व अविनाश बारगजे आदी मान्यवर उपस्थित होते. नामदेव शिरगावकर यांनी राज्य अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर आणि तीन वषार्नंतर होणारी ही पहिलीच स्पर्धा असून या स्पर्धेला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे तसेच या स्पर्धेत तायक्वांदोची सर्व हायटेक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय सीनियर तायक्वांदो स्पर्धेत ३२ जिल्ह्यामधील ७५० खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. मुले आणि मुलींच्या पुमसे आणि स्पॅरिंग सिनियर गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचा अंतिम पारितोषिक वितरण समारंभ ४ डिसेंबर रोजी होणार आहे.