Saturday, July 20, 2024
Homeमहत्वाची बातमीगाजतोय साहित्याचा जागर

गाजतोय साहित्याचा जागर

नाशिकमध्ये आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात

स्वाती पेशवे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं ९४वं संमेलन अनेकार्थानं महत्त्वपूर्ण म्हणता येईल. पहिली बाब म्हणजे कोरोनाच्या घट्ट विळख्यामुळे मागील वर्षी स्थगित करून हे संमेलन एक वर्ष पुढे ढकललं गेलं. ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेमुळे चर्चेत आलेल्या या संमेलनातही सालबादाप्रमाणे बरेच विवादास्पद मुद्दे गाजले. ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर यांना आमंत्रण देण्याचा मुद्दा असो, संमेलनाचं स्थळ बदलण्याचा मुद्दा असो वा मराठीतल्या काही दिग्गज साहित्यिकांचा विसर पडण्याचा मुद्दा असो; यंदाही अशा काही मुद्द्यांनी चर्चेची राळ उठवली आणि वातावरण तापत राहिलं. आता या वादविवादाचा परिपाठ पचनी पडल्यासारखी स्थिती असल्यामुळे साहित्यप्रेमीही त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच त्यावर चर्चा न करता दरवर्षी पार पाडणाऱ्या या संमेलनाद्वारे नेमकं काय साधतं, हे बघणं गरजेचं आहे.

संमेलन घेणं आणि ते यशस्वीपणे पार पडणं हे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. हे लक्षात घेता नाशिकमधल्या संमेलनाच्या संयोजकांनी आणि हजारो कार्यकर्त्यांनी ते उचललं आहे, असं म्हणत त्यांचं मोकळेपणानं कौतुक करायला हवं. एवढा मोठा उत्सव पार पडावा, त्याचं नेटकं नियोजन व्हावं, यासाठी लागणारी दृष्टी आणि क्षमता संयोजक-कार्यकर्त्यांकडे पुरेपूर असल्यानंच हे घडत आहे, हे स्पष्टच आहे. टीका करणं खूप सोपं असतं. पोहता न येणाऱ्यानं काठावर बसून कसं पोहावं, याबद्दल मार्गदर्शन करत राहावं, तसंच टीकाकारांचंही होतं. पुरेशी मदत उपलब्ध असतानाही छोटे-छोटे घरगुती समारंभ आयोजित करताना पंचाईत अनुभवणाऱ्यांनी, संमेलनासारख्या अतिव्यापक व्यवस्थांची गरज असलेल्या सोहळ्यातल्या किरकोळ उणिवा दर्शवण्यासाठी आवाजाचे बाण आणि भाले बाहेर काढावेत, हे पटत नाही.

इथेच सहिष्णू वृत्तीची गरज असते. मराठी माणसाचं एक व्यवच्छेदक लक्षण म्हणून टीकेचं समर्थन केलं जातंही; पण याच लक्षणामागील छिद्रान्वेषी वृत्ती झाकून राहत नाही. मराठीपणाची इतर अनेक चांगली लक्षणंही आपल्या संस्कृतीचं वेगळेपण दर्शवणारी आहेत.

दरवेळी साहित्य व्यवहारात काही गोष्टी घडल्या की, त्याचं खापर साहित्य संस्थांवर फोडलं जातं; परंतु यासंदर्भात साहित्य संस्थांची बाजू विचारात घेतली जात नाही. हे लक्षात घेऊन डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात ‘साहित्य व्यवहार आणि माध्यमांचे उत्तरदायित्व’ असा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. यामध्ये साहित्य संस्थांसोबतच माध्यमातील लोकांनाही आपली बाजू मांडता आली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या उण्या-अधिक बाजू जाणून घेण्याची संधी रसिकांना प्राप्त झाली. आणखी एक दखल घेण्याजोगी बाब म्हणजे आजवर विविध साहित्य संमेलनांमध्ये बालकुमार साहित्यावर चर्चा करण्यात आली; परंतु या चर्चेत बालकुमारांचा सहभाग नसायचा. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात प्रथमच ‘बालकुमार प्रतिभाविश्व’ हा कार्यक्रम सादर केला गेला. या कार्यक्रमात लहान मुलांनी स्वरचित कविता सादर केल्या. त्याचबरोबर विविध विषयांवर लहान मुलांना भाषणाचीही संधी उपलब्ध करून दिली गेली.

हा आगळावेगळा कार्यक्रम हे त्या साहित्य संमेलनाचं आकर्षण ठरला. त्या धर्तीवर यंदाच्या साहित्य संमेलनाची आकर्षण केंद्रं कोणती राहतील, हे जाणून घेण्यास साहित्यप्रेमी उत्सुक आहेत.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नीलिमा गुंडी या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मनमोकळा संवाद साधताना म्हणतात, ‘अत्यंत उत्सुकतेनं मी या साहित्य संमेलनाकडे पाहिलं. कोरोनानंतरचं संमेलन असल्यामुळे या संमेलनासाठी अत्यंत आशावादी वातावरण बघायला मिळालं. खरं सांगायचं तर अशा संमेलनांची आत्यंतिक गरज असते. भाषेच्या चलनवलनासाठी संमेलनांची आवश्यकता असते. यानिमित्तानं रसिक आणि साहित्यिक यांच्या भेटीगाठी होतात. समाजमन संघटित होण्यासाठी अशा संमेलनांचा उपयोग होत असतो. विशेषत: अशा संमेलनांमुळे समाजमन एकसंध राहण्यास मदत होते. या अर्थानेही मला संमेलनाला हजेरी लावण्याची उत्सुकता जाणवली.’

त्या म्हणतात, ‘दरवर्षी पार पडणाऱ्या संमेलनामध्ये आणि या संमेलनामध्ये एक महत्त्वाचा फरक म्हणजे यावेळी कोरोना हेच संमेलनापुढील मोठं आव्हान होतं. त्याखेरीज मराठी भाषेची स्थिती आणि मराठी माध्यमांच्या शाळांची दयनीय स्थिती हेदेखील मोठं आव्हान आहे. पण असं असलं तरी याच कोरोनाकाळात ऑनलाइन पद्धतीनं मराठी साहित्याकडे वळलेल्या आणि या माध्यमातून मराठी साहित्याचा आस्वाद घेणाऱ्या वाचकांची संख्याही नोंद घेण्याइतकी वाढली. मराठी पुस्तकांची ऑनलाइन विक्रीही लक्षणीयरीत्या वाढल्याचं दिसलं. मात्र असं असलं तरी, पुस्तक हातात घेऊन वाचणं ही पूर्वापार वाचनसंस्कृती काळानुरूप कमी होताना दिसणं, ही निश्चितच चिंतेची बाब म्हणता येईल. त्यामुळेच पुढच्या पिढीला पुस्तक वाचनाची सवय लावणं हे याच नव्हे, तर पुढच्या प्रत्येक संमेलनापुढचं आव्हान असणार आहे.’

कोरोनाकाळाने साहित्यविषयक जाणिवांमध्ये काय फरक पडला, हे स्पष्ट करताना डॉ. गुंडी म्हणतात, ‘या काळात घरातल्या दोन-तीन पिढ्या बराच काळ एकत्र राहिल्या. त्यांच्यामध्ये विचारांची देवाण-घेवाण झाली. त्यातच आधी उल्लेख केल्याप्रमाणे ऑनलाइन वाचन हा साहित्यव्यवहार रुजण्यास मदत झाली आणि दुसरीकडे ऑनलाइन पद्धतीनं आपण समाजाशी जोडले जाऊ शकतो आणि या माध्यमातून आपण साहित्यविषयक संवाद साधू शकतो, हा अनुभव नव्यानं अनेक साहित्यिकांनी घेतला.

विशेष म्हणजे, विविध वयोगटातल्या मंडळींना हा अनुभव आला. हा मराठी साहित्यासाठी एक प्रकारचा पूल तयार झाला असंही आपण म्हणू शकतो. त्यामुळेच यापुढे आता अधिकाधिक लोकांकडून त्याचा वापर केला जाईल, अशी आशा आहे. साहित्यिकही त्याचा यथायोग्य वापर करतील अशी आशा आहे. या ऑनलाइन पद्धतीमुळे वेळ आणि बाहेर पडण्याचा खर्च या सगळ्यांचीच बचत होते. त्यामुळे यापुढे ऑनलाइन पद्धतीनं साहित्य आणि रसिक एकमेकांच्या संपर्कात राहण्याचा पायंडा अधिक मूळ धरेल, असं मला वाटतं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -