शहापूर (वार्ताहर) : शहापूर तालुक्यात मंगळवार व बुधवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. दुपारनंतर सुरू झालेल्या जोरदार पावसाने रब्बी पीक, शेतातील भाजीपाल्याचे नुकसान झाले असून वीट उत्पादक व पेंढ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने गुरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण होणार आहे.
खरीप हंगामानंतर तूर, हरभरा, मूग, वाल या रब्बी पिकांचे उत्पादन घेतले जाते. खरीप भात कापणीनंतर शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली. मात्र अवकाळी पावसामुळे कडधान्याचे पेरणी केलेले बियाणे कुजून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.
दमट वातावरणाचा पिकांना फटका
दमट वातावरण आणि अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकासमोर संकट उभे राहिले आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी ढोबळी मिरची, वांगी, कारली, तसेच कडधान्यासह भाजीपाल्यांची लागवड केली आहे. मात्र, पावसाळी वातावरणामुळे पिकांचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
अवकाळी पावसाने भाताच्या पेंढ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण होणार आहे़ पेंढ्या कुजण्याच्या अवस्थेत आहेत. भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसला आहे़
– महेंद्र भेरे, प्रगतशील शेतकरी, कानवे