लखनऊ : अयोध्येत एका अज्ञात व्यक्तीने डायल-११२ वर कॉल करून बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. याआधी गेल्या महिन्यातही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने पत्र पाठवून धमकी दिली होती. यापार्श्वभूमीवर अयोध्येत हाय अलर्ट घोषित करण्यात आले आहे.
बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी अयोध्येचे प्रवेशद्वार, हॉटेल, धर्मशाळा तसेच रेल्वे स्थानक आणि बस स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. तसेच अयोध्या स्थानकावरून जाणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली आहे.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश पोलिसांना गुप्तचर यंत्रणेकडून सूचना मिळाली होती. तसेच दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या नावाने मिळालेल्या धमकीच्या पत्रात लखनऊ, अयोध्या, कानपूर, वाराणसीसह ४६ रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. गुप्तचर यंत्रणेच्या या अलर्टनंतर रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली.
आरपीएफ, जीआरपी आणि पोलिसांव्यतिरिक्त श्वान पथकाने लखनऊ, कानपूरसह अनेक रेल्वे स्थानकांचीही तपासणी केली आणि शोधमोहीमही राबविण्यात आली.
याच दहशतवादी संघटनेने यापूर्वी २०१८ मध्येही अशीच धमकी दिली होती.