मुंबई (प्रतिनिधी) : वरळी बीडीडी चाळीतील गॅस सिलिंडर स्फोटातील जखमी चिमुकल्याच्या मृत्यूनंतर नायर रुग्णालय प्रशासनावर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत असताना आता या प्रकरणी २ डॉक्टर आणि एका नर्सचे निलंबन करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली असून प्राथमिक अहवाल येताच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणी त्रयस्थ समितीद्वारे चौकशीही केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
वरळी बीडीडी चाळीतील एका घरात मंगळवारी सकाळी सिलिंडर स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटूंबातील चार जण जखमी झाले. या जखमींना जवळच्या नायर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांकडून हलगर्जीपणा करण्यात आला होता. याबाबतचा व्हिडीयो देखील वायरल झाला होता. दरम्यान ४ महिन्यांच्या बालकाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात नायर रुग्णालयाने चौकशी समिती नियुक्त केली असून २ डॉक्टर आणि एका नर्सला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी सुरु आहे. समितीचा प्राथमिक अहवाल आल्यावर दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत