Friday, July 19, 2024
Homeमहत्वाची बातमीसाहित्य संमेलनापुढे अडचणींचा ‘पाऊस’

साहित्य संमेलनापुढे अडचणींचा ‘पाऊस’

आधी वाद, मग ‘ओमायक्रॉन’; आता ‘अवकाळी’चे संकट

नाशिक (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी नाशिकमध्ये सुरुवात होत असून साहित्यिकांचा मेळा अखेर भरणार आहे. मात्र या संमेलनासमोरची संकटे कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आधी वेगवेगळे वाद उभे राहिले. मग कोरोनाचे संकट, कोरोनामुळे बदललेल्या तारखा आणि नंतर नवा ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटचा धोका. त्यानंतरही संमेलन दोन दिवसांवर आले असताना आलेला हा

अवकाळी पाऊस

साहित्यिकांसाठी पर्वणी असलेल्या साहित्य संमेलनाची वाट वाचक, रसिकांनाही तितकीच असते. मात्र साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. यंदा नाशिकमध्ये होत असलेल्या साहित्य संमेलनाबाबतही सुरुवातीपासून वाद सुरु आहेत. अपेक्षेप्रमाणे मानापमान नाट्य रंगले. साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाशिकमध्ये वास्तव्यास असणाऱ्या केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांची नावे नसल्याने महापौर सतिश कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीसांच्या नावाचा समावेश पत्रिकेत केला असून ते संमेलनात सहभागी होणार असल्याचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळा यांनी सांगितले आणि या वादावर पडदा पडला.

आघाडीच्या नेत्यांना स्थान

भाजप नेत्यांनी, साहित्य संमेलन एकतर्फी होत आहे असा आरोप केला होता. संमेलनात केवळ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. भाजपच्या नेत्यांना निमंत्रण न देता जाणुन बुजून डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप महापौरांनी केला. भाजपच्या तिन्ही आमदारांनी १० लाखांचा निधी दिला.महापालिकेने २५ लाख निधी देऊनही भाजपच्या नेत्यांना स्थान नसल्याने आयोजकांचे चांगलेच कान टोचले होते. साहित्य संमेलनात साहित्यिकांचा सन्मान राखला जावा. संमेलन सर्व समावेशक असावे, एकतर्फी असू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रंथ दिंडी नशिकमध्ये निघणार असल्याने केवळ ग्रंथ दिंडीला उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या आधी संमेलन गीतात सावरकरांचे नाव नसल्याने मनसेनं उठवला आवाज होता. मनसेच्या इशाऱ्यानंतर सावरकरांच्या नावाचा गीतामध्ये समावेश केला आहे.

संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे सावट

साहित्य संमेलन ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी होत आहे. कोरोनामुळे साहित्य संमेलनाचा मार्च आणि नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त हुकला होता. आता डिसेंबर महिन्यात संमेलनावर नव्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटचे सावट दिसत आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

अवकाळीचे संकट

नाशिकमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्यामुळे संमेलनाच्या मुख्य सभा मंडपात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी चिखल झाला आहे. पावसाने जोर धरल्याने कवी कट्टा आणि बालकाव्य हे दोन कार्यक्रम खुल्या जागेऐवजी सभागृहात घेतले जाणार आहेत.

पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे साहित्यिकांसह रसिकांचीही मोठी गैरसोय होणार असून उपस्थितीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -