वैभववाडी (प्रतिनिधी) :वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात एकही डॉक्टर नसल्याने आरोग्यसेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. गेले चार दिवस या रुग्णालयात एकही डॉक्टर नाही. व्हेंटीलेटवर असलेल्या या रुग्णालयाकडे आरोग्य प्रशासन लक्ष देणार कधी? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
कोरोनाच्या काळात या रुग्णालयात तीन डॉक्टर कार्यरत होते. तिन्ही डॉक्टर हे कंत्राटी म्हणून काम करत होते. यातील दोन डॉक्टर परराज्यातील होते. त्यांना गेली सहा महिने पगार न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिला. तर कार्यरत असलेले तिसरे डॉक्टर हे रजेवर गेले आहेत. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उपचाराविना माघारी परतावे लागत आहे.
सध्या रुग्णालयात प्रयोग शाळा तंत्रज्ञ, एक्सरे तंत्रज्ञ उपलब्ध आहेत. तंत्रज्ञ आहेत पण डॉक्टरच नाहीत त्यामुळे रुग्णांवर उपचार तरी होणार कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉक्टरांप्रमाणेच औषध निर्माता हे पदही रिक्त असून सध्या हे काम रुग्णालयातील आरोग्य सेविकांनाच करावे लागत आहे. तसेच सफाई कामगार व अन्य पदेही रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व अन्य रिक्त कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.