
मुंबई : काँग्रेसमुक्त भारत हा भाजपचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी भाजप नेत्यांना फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत. अजून जन्मासही न आलेल्या तिसऱ्या आघाडीच्या ममता बॅनर्जी हे काम पूर्ण करतील, अशी चिन्हे दिसत असल्याचा टोला भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी लगावला आहे.
आता यूपीए शिल्लक राहिलेली नाही, हे फक्त जाहीर करायचे बाकी आहे. तसेच राहूल गांधी सतत परदेशात असल्याने ते भाजपविरोधात आंदोलने कशी करणार, अशी टीका बॅनर्जी यांनी केली होती. त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तरही दिले होते.
या वादात आता लाड यांनी उडी मारली आहे. फक्त भाजपविरोध आणि नरेंद्र मोदी यांना विरोध हेच एकमेव उद्दीष्ठ घेऊन मोट बांधणाऱ्या तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांकडे देशहितासाठी कोणताही ठोस कार्यक्रम नाही. त्यातील अनेक नेते तर फक्त पंतप्रधानपद मिळविण्याच्या इच्छेने पछाडलेले आहेत. मात्र स्वबळावर ते पद मिळविण्याची ताकद त्यांच्यातील एकाकडेही नाही, एकमेकांच्या कुबड्यांचा आधार घेत हिमालयावर जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या अशक्यप्राय कामात त्या सर्वांचा कपाळमोक्ष तर होणार आहेच. मात्र ते देशाचे व जनतेचेही नुकसान करतील ही भीती असल्याचेही लाड म्हणाले.
काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही प्रादेशिक पक्षांना खिजगणतीतही न धरता मधूनच स्वबळाचा नारा देत असतात. त्यामुळे भाजपविरोधी आघाडीची भाषा करणाऱ्या काँग्रेस, डावी आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आदी नेत्यांनी प्रथम स्वतःच्या ताकदीचे आत्मपरिक्षण करावे. ज्या कथित सहकाऱ्यांच्या बळावर त्यांना ही उडी मारायची आहे ते आपल्या साथीला आहेत का याची खातरजमा या सर्वच पक्षांच्या विशेषतः काँग्रेस नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत करावी. अन्यथा या मित्रपक्षांनी शेवटच्या क्षणी टेकू काढून घेतला तर दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला, अशी अवस्था या डाव्या पक्षांची होईल, असा टोलाही लाड यांनी लगावला आहे.