किशोरांची कर्नाटकवर, तर किशोरींची पंजाबवर मात
आशीष गौतमला ‘भरत’, तर सानिका चाफेला ‘ईला’ पुरस्कार
उना (वार्ताहर) : ३१व्या राष्ट्रीय किशोर-किशोरी अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने उना, हिमाचल प्रदेश येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर इतिहास रचला. बुधवारी झालेल्या अंतीम फेरीत महाराष्ट्राच्या किशोरांनी कर्नाटकवर, तर किशोरींनी पंजाबवर विजय मिळवत दुहेरी मुकुटासह अजिंक्यपद मिळवले. किशोर गटाने आतापर्यंत १० वेळा, तर किशोरीने गटाने १५ वेळा विजेतेपद पटकाविले आहेत. किशोर गटाने सलग ६ वेळा विजेतेपद कायम राखले आहे. झारखंड येथे मागील वर्षी झालेल्या स्पर्धेत किशोरींना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, तर या वेळी महाराष्ट्राने मिळवलेले हे सहावे दुहेरी अजिंक्यपद आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा ‘भरत’ पुरस्कार आशीष गौतमला, तर ‘ईला’ पुरस्कार सानिका चाफेला देऊन गौरवण्यात आले.
बुधवारच्या अंतीम फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या किशोर संघाने कर्नाटकवर १०-०६ असा एक डाव ४ गुणांनी विजय मिळवत कर्नाटकचा धुव्वा उडवला. या सामन्यात महाराष्ट्राने सुरवातीपासूनच कर्नाटकला डोकं वर काढण्याची जराही संधी दिली नाही. महाराष्ट्राच्या आशीष गौतम (२:१०, ३:१० मि. संरक्षण व १ गडी), जीतेंद्र वसावे (२:००, १:३० मि. संरक्षण), हाराद्या वसावे (१:२०, २:०० मि. संरक्षण व २ गडी), अथर्व पाटील (नाबाद १:३० मि. संरक्षण) व मोहन चव्हाण (३ गडी) व कर्णधार सोत्या वळवी (२ गडी) व राज जाधव (२ गडी) यांनी विजयात चमकदार खेळी केली. तसेच पराभूत कर्नाटकच्या प्रीथम (१:१० मि. संरक्षण व २ गडी), पी. गुरूबत (१ मि. संरक्षण व १ गडी) व एल. व्ही. समर्थ (१:१० मि. संरक्षण) यांनी केलेली खेळी त्यांना मोठ्या परभवापासून वाचवू शकली नाही. महाराष्ट्राचे संघ प्रशिक्षक प्रफुल्ल हाटवटे, व्यवस्थापक मंदार परब व फिजिओ डॉ. किरण वाघ यांनी हा सांघिक विजय असल्याचे सांगितले.
महाराष्ट्राच्या किशोरींनी अंतिम फेरीच्या सामन्यात पंजाबला ११-०३ असा एक डाव ८ गुणांनी धूळ चारली. या स्पर्धेतील सर्व सामने डावाने जिंकले होते. त्यात प्रशिक्षक मुंबईच्या एजाज शेख यांचा मोठा वाटा आहे. कोविड पार्श्वभूमीवर खेळाडू जवळजवळ दीड-दोन वर्षे मैदानात नव्हते. अशा वेळी खेळाडूंमध्ये समन्वय घडवणे व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांच्याकडून अप्रतिम कामगिरी घडवून घेणे, हे काम एजाज शेख यांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले. महाराष्ट्राच्या कर्णधार सानिका चाफे (५:५०, नाबाद ३:१० मि. संरक्षण व ४ बळी), सुषमा चौधरी (नाबाद १:१०, २:५० मि. संरक्षण व १ बळी), धनश्री कंक (१:०० मि. संरक्षण) व अंकिता देवकर (४ बळी), धनश्री करे (१ बळी), समृध्दी पाटील (१ बळी) यांनी महाराष्ट्राच्या विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी केली, तर पंजाबच्या स्नेहप्रीत कौर (१:३० मि. संरक्षण व १ बळी) व संजना देवी (१:३० मि. संरक्षण) यांनी एकाकी लढत देण्याचा प्रयत्न केला, पण पंजाबच्या इतर खेळाडूंना महाराष्ट्राच्या खेळाडूंसमोर मैदानात टिकाव धरता आला नाही हेच खरे. या विजयानंतर प्रशिक्षक एजाज शेख व व्यवस्थापिका प्रियांका चव्हाण यांनी या चमकदार कामगिरीवर समाधान व्यक्त केले.
यापूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या किशोर संघाने हरियाणाचा १३-०७ असा एक डाव ६ गुणांनी धुव्वा उडवला, तर किशोरींनी दिल्लीचा १०-०६ असा ४ गुणांनी पराभव केला.