नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी आयपीएलच्या हंगामासाठी काही संघांनी आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंनाही करारमुक्त केले आहे. करारमुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंची नावे आहेत. मुक्त करण्यात आलेल्या खेळाडूंना जानेवारीत होणाऱ्या भव्य लिलाव प्रक्रियेत संघांना पुन्हा खरेदी करता येऊ शकेल. के. एल. राहुलला पंजाब किंग्सच्या संघाने रिटेन केलेले नाही.
आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या शिखर धवनला दिल्ली कॅपिटल्सने करारमुक्त केलंय. कसोटी संघामध्ये नुकतेच पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरला दिल्लीच्या संघाने रिटेन केलेले नाही. ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला सनरायझर्स हैदराबाद या संघाने रिटेन केलेले नाही.
अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला दिल्लीच्या संघाने रिटेन केलेले नाही. अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि यष्टीरक्षक ईशान किशन यांना मुंबई संघाला मुक्त करावे लागले. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला सनरायझर्स हैदराबादने रिटेन केलेले नाही.
धोनी, जडेजा चेन्नईसोबत कायम
आगामी आयपीएलच्या हंगामासाठी रिटेन करणार असणाऱ्या खेळाडूंची यादी संघांनी मंगळवारी जाहीर केली. या यादीमध्ये चेन्नई सुपर किंग्सने आपल्या चार खेळाडूंना रिटेन केले आहे. यामध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा समावेश आहे. विशेष म्हणजे कर्णधार धोनीपेक्षा चेन्नईच्या व्यवस्थापनाने जडेजासाठी अधिक पैसे मोजले आहेत. त्यामुळे रविंद्र जडेजा आता चेन्नईसाठीचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
तसेच चेन्नईच्या संघाने आधी रविंद्र जडेजाची निवड रिटेन केला जाणारा फर्स्ट चॉइस म्हणून केली. त्यानंतर त्यांनी धोनीला संघात स्थान दिले. चेन्नईच्या संघाने महेंद्र सिंग धोनीला १२ कोटींच्या किंमतीला रिटेन केले आहे, तर जडेजासाठी चेन्नईने १६ कोटी मोजलेत. याशिवाय चेन्नईने ऋतूराज गायकवाडलाही संघात रिटेन केले आहे. परदेशी खेळाडू रिटेन करण्याची संधी म्हणून चेन्नईच्या संघाने इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला रिटेन केले आहे.
रोहित, बुमरा, सूर्यकुमार आणि पोलार्ड मुंबईसोबतच
मुंबईच्या संघाने यावेळी कर्णधार रोहित शर्माला १६ कोटी रुपये मोजत आपल्या संघात स्थान दिले आहे. रोहितबरोबर यावेळी मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांना संघात कायम ठेवले आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ यावेळी रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांना संघात कायम ठेवेल, असे म्हटले जात होते. मुंबईच्या संघाने १६ कोटी रुपये मोजत रोहितला संघात कायम ठेवले, त्याचबरोबर बुमरासाठी त्यांनी यावेळी १२ कोटी रुपये मोजले. या दोघांनंतर मुंबईच्या संघाने तिसऱ्या स्थानावर पसंती दिली, ती सूर्यकुमार यादवला.
मुंबईच्या संघाने आठ कोटी रुपये मोजत सूर्यकुमारला आपल्या संघात कायम ठेवले. मुंबईच्या संघाने यावेळी उपकर्णधार कायरन पोलार्डला सहा कोटी रुपये मोजत आपल्या ताफ्यात कायम ठेवले आहे.