
वाड्यात रब्बी हंगामात वाल, हरभरा, मूग, तूर, तीळ, भाजीपाला, कलिंगड, सूर्यफूल या पिकांचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणीही केली आहे. शेत मात्र पूर्णपणे पाण्याने भरल्याने बियाणे कुजून वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
तालुक्यातील सागे येथील शेतकरी अनिल पाटील यांनी चार दिवसांपूर्वी दोन एकर जागेत आधुनिक पद्धतीने कलिंगडची लागवड केली आहे. या संपूर्ण शेतीमध्ये पाणी भरल्याने बियाणे कुजून वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच, बोरांडा येथीलही एका शेतकऱ्याने पावणेदोन एकरावर कलिंगडची लागवड केली होती. त्यांचीही शेती पाण्यात भरल्याने कलिंगडाचे बियाणे कुजून वाया जाण्याची शक्यता आहे.
बळीराजाचे सर्व कष्ट पाण्यात
जामघर येथील एका शेतकऱ्याने २०० भाऱ्यांची कापणी केलेली भाताची करपे पाण्यात वाहून गेल्याने आता वर्षभर खायचे काय?, असा प्रश्न या शेतकऱ्याला पडला आहे. वर्षभर काबाडकष्ट केले, पण हे कष्ट अवकाळी पावसाने व्यर्थ घालवल्याने शेतकरी मात्र मेटाकुटीस आले आहेत.
आतापर्यंत कोणत्याही वर्षी अशी नैसर्गिक आपत्ती ओढावली नव्हती. कोरोना काळातही कलिंगडचे उत्पादन घेतले; परंतु या अवकाळी पावसामुळे माझी कलिंगडची संपूर्ण शेती वाया जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.- समीर कवळे, शेतकरी, बोरांडा
वरिष्ठांकडून आदेश येताच शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात होईल. - सुनिल लहांगे, नायब तहसीलदार, वाडा
शेतात कापून ठेवलेले भातपिक अवकाळी पावसाच्या पुरात वाहून गेल्याने वर्षभराच्या खावटीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
- रामचंद्र गोळे, शेतकरी, जामघर