पालघर (वार्ताहर) : गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांनासुद्धा हवालदिल केले आहे. दरम्यान, असे असतानाच बुधवारी दुपारी पालघर जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. तथापि, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाली नसली तरी पावसाने जोर धरलेला असतानाच भूकंप आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पालघर जिल्ह्यामधील डहाणू, तलासरी, धुंदलवाडी परिसरात बुधवारी दुपारी दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी ३ वाजून ४३ मिनिटांनी ४.० रिक्टर स्केलचा पहिला तर ३ वाजून ५७ मिनीटांनी ३.५ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा दुसरा धक्का बसला असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच, कोणतेही मोठे नुकसानही झाले नाही. परंतु, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
याचबरोबर पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात पावसाची संततधार दुसऱ्या दिवशीही सुरू होती. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने दुपारी विश्रांती घेतली. परंतु पुन्हा पावसाने जोर धरला. त्यामुळे नदी-नाले पुन्हा तुंबले. तसेच, शिरगाव नवापूर या ठिकाणी गुरांचा चारा ठेवण्यात आलेल्या घरांनासुद्धा पावसाचा फटका बसला. गुरांचा चारा भिजल्याने शेतकरी चिंतित आहेत. दरम्यान, गुरुवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली असली तरी धोक्याचा इशारा टळला नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.