नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ममतांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. विशेष म्हणजे ही टीका करताना त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचाच जुना व्हिडीओ ट्विट केला आहे. यात कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चाल चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही.” अलीकडे काँग्रेसबाबत काही मंडळी़ंना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली, असे ट्विट चव्हाण यांनी केले आहे.
"काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे.
काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही."
अलीकडे काँग्रेसबाबत काही मंडळी़ंना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमिवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली. pic.twitter.com/Lj2Io8kHb6— Ashok Chavan (@AshokChavanINC) December 2, 2021
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. काल त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. आता त्यांच्या या टीकेवर काँग्रेसकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहेत.
ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, आज ज्या प्रकारे देशात फॅसिझम सुरु आहे, त्याविरोधात सक्षम पर्याय निर्माण झाला पाहिजे. मात्र, हे कोणा एकट्याचे काम नाहीये. जो जो सक्षम आहे त्याला घेऊन हे करावे लागेल. भाजपविरोधात लढणारा सक्षम पर्याय असायला हवा, मात्र कोणी लढायला तयार नाही त्याला आम्ही काय करणार? अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली. तसेच आता काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए राहिली नसल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.