Thursday, March 20, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यकोकणात थंडी, पाऊस आणि निवडणुका...!

कोकणात थंडी, पाऊस आणि निवडणुका…!

संतोष वायंगणकर

महाराष्ट्रात सध्या नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गेल्या पावणेदोन वर्षांत निवडणुका फारशा झाल्या नाहीत; परंतु आता पुढचे दोन महिने निवडणुकीचेच आहेत. जिल्हा बँक आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यावर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतील, असे म्हटले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांत सार्वजनिक कार्यक्रम, विवाह समारंभ आदी सगळ्याच कार्यक्रमांच्या बाबतीत निर्बंधाची चौकट पार न करता कार्यक्रम होत होते. आता ओमायक्रॉन व्हेरिएंट या नव्या व्हायरसच्या मुळे सारं जग पुन्हा एकदा भीतीच्या छायेखाली आहे. महाराष्ट्रातही याची भीती अधिक मानली जात आहे.

एकीकडे हे सारे नवे संकट उभे आहे आणि यासंबंधी कोणालाच फार काही माहिती नाही. मात्र, त्या संबंधीची भीती अधिक असल्याचे सांगितले जाते. कोरोनामध्ये अर्थव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला. सारं ‘होत्याचं नव्हतं’ झालं. गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत अशा तीन वर्गांत आपली समाजरचना होती, असे मानले जायचे; परंतु कोरोनाकाळात एक नवीन वर्ग तयार झाला. तो वर्ग ‘मध्यमवर्गीय गरीब’ या संज्ञेत मोडला जाऊ लागला. मध्यमवर्गीय म्हणून ओळखला जाणाराच आता गरिबीत गेला आहे.

या सर्वांतून सावरण्याचे सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत; परंतु संकटांची मालिका थांबता थांबत नाही, अशी स्थिती आहे. निसर्गचक्र तर बिघडले आहेच. बिघडलेल्या या निसर्गचक्रातही आपण अडकलो आहोत. नोव्हेंबर संपून डिसेंबर सुरू झाला तरीही अजूनही थंडी नाही. थंडी पडल्याखेरीज झाडांना मोहोर येणार नाही. मोहोर उशिरा आला तरीही फळनिर्मितीचं चक्रही बिघडणार. थंडीच आगमन होतंय, असे वाटले होते. दोन दिवस थोडीफार थंडी जाणवली. हवेतल्या या गारव्याने बागायतदार शेतकरी सुखावला होता; परंतु तो आनंदही दोन दिवसांपुरताच होता. पुन्हा एकदा पाऊस पाच दिवसांसाठी हजेरी लावणार, असे हवामान खात्याने जाहीर केले. मागील आठवडाभरही पाऊस जुलै-ऑगस्ट महिन्यात पडावा तसा पडत होता. पावसाच्या या अवकाळी सरींनी सारेच अचंबित झाले. केव्हा काय घडेल, काय होईल हे सांगणेही अवघड झाले आहे. थंडी असते, पाऊस पडतो तेव्हाच उष्माही खूप जाणवतो. हे सारे बदलते वारे शेवटी शेती बागायतीच्या मुळावर येणारे आहेत.

या सर्व अशाच वातावरणामध्ये कोकणात नगरपंचायत आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. नगरपंचायत आणि बँक निवडणुकीमुळे कोकणातील राजकीय वातावरण बऱ्यापैकी तापले आहे. सहकारच्या निवडणुका या त्यांच्या ठरावीक असणाऱ्या मतदारांतूनच होत असतात. पूर्वापार असलेलेच मतदार असतात. यामुळे आजवर या निवडणुका बिनविरोध होत राहिल्या. काही अपवादात्मक वेळी निवडणूकही झाली आहे. नगरपंचायत निवडणुका या सर्वच राजकीय पक्षांकडून प्रतिष्ठेच्या केल्या जाण्याची शक्यता अधिक आहे. महाराष्ट्रात सत्तास्थानी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार, असे सांगितले जात असले तरीही काँग्रेस पक्षाने या निवडणुका स्वतंत्रपणे लढविणार, असे जाहीर केले आहे.

शिवसेना या निवडणुकीत आपल्याच शिवसैनिकांना अधिकच्या जागा वाट्याला याव्यात यासाठी आग्रही आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका फार सावध आहे. मात्र, निर्णायक आपणच असू अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. भाजपने या निवडणुकीत कोणत्याही स्थितीत यशस्वी व्हायचेच, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हिवाळ्यातल्या गुलाबी थंडीतही राजकीय वातावरण तापलेले आहे. रत्नागिरी मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत बँक अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्याच पॅनलला यश मिळाले. मात्र, रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचे दोन सदस्य निवडून येऊ शकले. या निवडणुकीतील हा चंचुप्रवेश भविष्यात रत्नागिरी जिल्हा बँकेमध्ये एकतर्फीच सगळं घडेल, असं होणार नसल्याचे संकेत देणारे आहेत. कोकणातील हे सारे राजकीय आणि सहकार क्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. २०२१च्या या वर्षअखेरीला कोकणातील राजकीय वातावरण बऱ्यापैकी तापले आहे. राजकीय आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना ‘सुगी’चे दिवस आले आहेत, असे मानले जात आहे.

थंडी, अधून-मधून कोसळणारा पाऊस आणि नगरपंचायत आणि जिल्हा बँकसह सहकारच्या निवडणुका होत असल्याने मधल्या दोन वर्षांत कोरोनामुळे भीतीच्या सावटाखाली वावरत असणारा कार्यकर्ताही या सर्व निवडणुकांमध्ये उत्साहाने सामोरा जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे, माघार घेणे, प्रत्यक्ष निवडणुका या सगळ्यांमध्ये सध्या कोकण गुंतलं आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -