मुंबई (प्रतिनिधी) : वरळी बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटातील जखमी चिमुकल्याचा बुधवारी मृत्यू झाला. नायर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत या प्रकरणी रुग्णालय प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ भाजप सार्वजनिक आरोग्य समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला.
दरम्यान गुरुवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार योगेश सागर, आमदार अमित साटम, गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची भेट घेऊन झालेल्या दुर्दैवी प्रकाराची सविस्तर माहिती घेतली. यावेळी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजही पाहण्यात आले. यात रुग्णसेवेत हेळसांड, दुर्लक्ष व गोल्डन अवरमध्ये विलंब झाल्याचे मान्य केले. यामुळे भाजपच्या शिष्टमंडळाने मृत बालकाच्या नातेवाइकांना पंचवीस लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच या घटनेची चौकशी महापालिकेबाहेरील तज्ज्ञ डॉक्टरांच्या त्रयस्थ समितीद्वारे करण्यात यावी, अशी देखील मागणी केली आहे. तसेच रुग्णालयातील दोषी डॉक्टरांवर आग्रीपाडा पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी महापालिका आरोग्य यंत्रणेवर ४५०० कोटी रुपये खर्च करते. मात्र असे असूनही रुग्णांवर दुर्लक्ष केले जाते. हे दुर्दैवी असल्याचे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी भाजपच्या आरोग्य समिती सदस्यांनी राजीनामा दिला आहे. बिंदू त्रिवेदी, हर्षिता नार्वेकर, सारिका पवार, बिना दोषी, प्रियांका मोरे, निल सोमैया, अनिता पांचाळ, सुनीता मेहता, प्रकाश मोरे, योगिता कोळी, राजुल देसाई या नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे.
वरळीतील बीडीडी चाळीतील एका घरात मंगळवारी सकाळी सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. जखमींना मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जखमींना वेळीच उपचार मिळाला नसल्याने जखमी चिमुरड्याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकाराबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.