Sunday, June 15, 2025

चैत्यभूमीवर बाबासाहेबांना करता येणार अभिवादन

चैत्यभूमीवर बाबासाहेबांना करता येणार अभिवादन


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात तसेच मुंबईत ‘ओमायक्रॉन’ विषाणूची भीती असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ऑनलाइन अभिवादन करावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. त्याला आंबेडकरी संघटनांनी विरोध दर्शवला होता. मात्र त्यानंतर भीम अनुयायांना चैत्यभूमीवर बाबासाहेबांचे दर्शन घेता येणार असल्याची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तथापि, मुंबईबाहेरून आलेल्या अनुयायांना अभिवादनासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आढावा बैठकीत घेतल्याचे महापौरांनी सांगितले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायांनी ऑनलाइन दर्शन घ्यावे, चैत्यभूमी परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन सरकारने केले आहे. मात्र त्याला विरोध करत इतर सण साजरे केले गेले, कार्यक्रम होत आहेत, मंदिरे उघडण्यात आली आहेत. मग महापरिनिर्वाण दिनावरच बंधने का? असा प्रश्न आंबेडकरी संघटनांकडून विचारला जात होता. दरम्यान, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जयदीप कवाडे यांनी आंबेडकरी अनुयायांना येण्यापासून रोखल्यास लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येतील असा इशारा देण्यात आला होता.


यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरी संघटनांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत चैत्यभूमीला येणाऱ्या अनुयायांचे कशा प्रकारे नियोजन आणि व्यवस्थापन करता येईल यावर चर्चा झाली. त्यानंतर महापरिनिर्वाण दिनी सर्व भीम अनुयायांना बाबासाहेबांचे दर्शन घेता येणार आहे. तसेच दूरदर्शनवरून ऑनलाईन दर्शन घेता येणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.


विशेष म्हणजे ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर मुंबई बाहेरील अनुयायांना ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर दर्शन घेऊ द्यावे. मुंबईमधील अनुयायांनी त्यानंतर दर्शन घ्यावे असे आवाहान महापौरांनी केले आहे. बाबासाहेबांना अभिवादन करताना कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करावे लागणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

Comments
Add Comment