Saturday, May 17, 2025

महाराष्ट्रसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गमध्ये पहिल्याच दिवशी २४,०२५ विद्यार्थ्यांची उपस्थिती!

सिंधुदुर्गमध्ये पहिल्याच दिवशी २४,०२५ विद्यार्थ्यांची उपस्थिती!

सिंधुनगरी (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या प्राथमिक शाळा बुधवारपासून पुन्हा सुरू झाल्या अन् मुलांच्या किलबिलाटाने दीड वर्षांनंतर शाळा गजबजून गेल्या. शहरी आणि ग्रामीण भागांतील अशा पहिली ते चौथी पर्यतच्या एकूण १४८० शाळांपैकी २९ शाळा तांत्रिक अडचणींमुळे बंद राहिल्या. तर बुधवारपासून १४५१ शाळा सुरू झाल्या. या शाळांच्या पटसंख्येवरील ३२,९९० पैकी २४,०२५ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी उपस्थिती दाखविली. परंपरेनुसार विद्यार्थ्यांच्या स्वागताने जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरू झाल्याने पालक, विद्यार्थी व शिक्षक या सर्वांनीच आनंद व्यक्त केला.
राज्यात आणि देशात कोरोना महामारीनंतर दोन दीड वर्षांनंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबतचा शासनाने निर्णय घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३९८ ग्रामीण व ८२ शहरी अशा १४८० शाळा आहेत. व ग्रामीण भागांत २३, ७३३ व शहरी ९२५७ मिळून एकूण ३२,९९० विद्यार्थी आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील १८,३०२ व शहरी भागातील ५,७२३ असे मिळून २४,०२५ विद्यार्थी उपस्थित राहिले. तब्बल दीड ते दोन वर्षांनंतर आपले सहकारी विद्यार्थी मित्र भेटल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने शासनाने पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून बुधवारचा पहिला दिवस विद्यार्थी व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत आणि शैक्षणिक उपक्रम, अपेक्षा, आनंदोत्सव असा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यामुळे पालक वर्गामध्येही उत्साहाचे वातावरण असून विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष जाऊन शिक्षण घेता येणार आहे. प्रदिर्घ काळानंतर शाळा सुरू झाल्याने पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे शाळांमध्ये आनंदाचे वातावरण होते.


Comments
Add Comment