Tuesday, April 29, 2025

महामुंबईठाणे

धसई वनक्षेत्रातील १५ बंधारे भागवणार प्राणी-पक्ष्यांची तहान

धसई वनक्षेत्रातील १५ बंधारे भागवणार प्राणी-पक्ष्यांची तहान

शहापूर (वार्ताहर) :पशुपक्षी, वन्यप्राणी यांची उन्हाळ्यातील तहान भागविण्यासाठी धसई वनक्षेत्रात १५ वनराई बंधारे श्रमदानातून बांधण्यात आले असून, त्यामुळे जंगलातील पक्षी व प्राण्यांची तहान भागणार आहे. उन्हाळ्यात जाणवणारी तीव्र पाणीटंचाई माणसांना जशी सतावते तशीच वन्यप्राण्यांची ही चिंता वाढविते. पर्यावरणात माणसासोबत वृक्षवल्ली, पशुपक्षी यांचे महत्त्व अनन्यसाधारण असून ही साखळी तशीच टिकवून ठेवली, तर पर्यावरणाचेही संवर्धन होते.

हे बंधारे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन बांधले आहेत. ऐन उन्हाळ्यात जंगलातील वन्य जीवांना पाणी मिळावे यासाठी धसई येथील वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी श्रमदानाचा अनोखा उपक्रम राबवला. जिंदाल कंपनीच्या सहकार्याने शिरगाव, चरीव, मुसई, नडगाव, अस्त्रोली, आंबेखोर व शिवनेर आदी ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या ओहोळावर रिकाम्या पोत्यांमध्ये माती भरण्यात आली. आपोआप गाळ उपसला जाऊन त्याचे खोलीकरणही झाले. त्यामुळे आता कोणत्याही पक्षी किंवा प्राण्यांना सहजपणे प्यायला पाणी उपलब्ध होणार आहे.

किन्हवली, कासगाव, सारंगपुरी या भागातही आणखी २० वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे. हेदेखील बंधारे श्रमदानाच्या माध्यमातून बांधणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी दिली. जंगलात बिबट्या, तरस, भेकर, रानडुक्कर, मोर आणि विविध पशुपक्ष्यासोबत वन्यप्राणी मुक्त संचार करत आहेत़ त्यांना या पाण्याचा निश्चित फायदा होईल, असे मत वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी सांगितले.

वनराई बंधारा बांधण्यासाठी धसई वनपरिक्षेत्र कर्मचारी, अशोक झुगरे, रत्ना पारधी, शिवाजी भोईर, बाळू शेरे, जिंदाल कंपनीच्या मोनिका खरे, प्रतीक बैरागी, आलोक राय, शिवनेरचे संयुक्त वनव्यवस्थापन समिती सदस्य अरुण फर्डे, किशोर फर्डे व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

Comments
Add Comment