यूपीए काय आहे?

  74

ममता-पवार भेटीमुळे महाविकास आघाडीतला पेच वाढण्याची शक्यता


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील यूपीएचे अस्तित्वच नाकारल्यामुळे सत्तेतल्या महाविकास आघाडीतले अंतर्गत मतभेद विकोपाला जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. यावेळी ममता बॅनर्जी यांना यूपीएबद्दल विचारले असता त्यांनी यूपीए काय आहे?, असा प्रतीप्रश्न केला. यूपीए आता उरली नाही, असेही त्या म्हणाल्या. शरद पवार यांनी यूपीएचे नेतृत्व करावे का?, या प्रश्नावर बोलताना त्यांनी याच प्रतीप्रश्नाचा पुनरूच्चार केला. जो प्रत्यक्ष मैदानात राहून, तळागाळात उतरुन लढू शकतो तो खरा विरोधक. जो लढतच नाही त्याला आम्ही काय म्हणणार? असे बोलून त्यांनी राहुल गांधी फक्त एसीत बसणारे नेतृत्व असल्याचे सूचित केले.


ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर स्वतः शरद पवार यांनीही सध्याचे राजकारण पाहता नेता रस्त्यावर राहिला तरच विजयी होऊ शकतो असे भाष्य केल्यामुळे पुढच्या काळात शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी ममता बॅनर्जींच्या आघाडीत सहभागी होण्याची दाट शक्यता असून त्यांच्याबरोबरच शिवसेनाही या प्रस्तावित आघाडीत सहभागी होऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे. या साऱ्या राजकीय घडामोडी पाहता महाविकास आघाडीतले अत्यंत दुय्यम स्थान पुढे किती काळ स्वीकारायचे? यावर काँग्रेसचे हायकमांड लवकरच नक्की निर्णय घेईल, असे काँग्रेसच्या गोटात बोलले जात आहे.


ममता बॅनर्जी मंगळवारपासून मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन सुरू केलेल्या या दौऱ्यात मंगळवारी रात्री शिवसेनेचे नेते संजय राऊत तसेच मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. बुधवारी दुपारी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक, या निवासस्थानी भेट घेतली. तेथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. येथे जवळजवळ तासभर ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय स्तरावरील राजकीय परिस्थितीची चर्चा केली. त्यानंतर ममता बॅनर्जी तसेच शरद पवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बातचीत केली.


ममता बॅनर्जींनंतर बोलताना शरद पवार म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या मताशी मी सहमत आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी मिळवलेला विजय हेच दाखवतो. तळागाळात काम करणारे लाखो कार्यकर्ते आणि ममता लढल्या त्यामुळेच ते शक्य झाले. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने नाते आहे. सध्याचे राजकारण पाहता नेता रस्त्यावर राहिला तरच विजयी होऊ शकतो असे ममता बॅनर्जींशी चर्चा करताना लक्षात आले. येत्या काळात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.



काँग्रेसच्या नेतृत्त्वाला कोणाच्या प्रशस्तीपत्राची गरज नाही : अशोक चव्हाण


लोकशाही व संविधानाप्रती कटिबद्धता आणि विद्यमान केंद्र सरकार विरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्त्वाला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेने लढा दिला. अनेक प्रश्नांवर काँग्रेसची आक्रमक व सक्रिय भूमिका संपूर्ण देशाने पाहिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सक्षम, खंबीर नेतृत्त्वाखाली हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढला जाईल, असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

Comments
Add Comment

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’

Devendra Fadanvis : पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; SDRF आणि NDRF यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री

नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात

Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad : आमदार गायकवाड बनियान-टॉवेलवर येतो अन् कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याची धुलाई; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारवाई...

मुंबई : नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक आमदार

'जेएनपीटी आणि वाढवन बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता' – मंत्री नितेश राणे

* परदेशी पतसंस्था १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार * बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण

अभिनेत्री आलिया भटला असिस्टंटने लावला ७७ लाखांचा चूना

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटची माजी पर्सनल असिस्टंट वेदिका प्रकाश