विक्रमगड (वार्ताहर) : विक्रमगड नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विक्रमगडचे राजकारण चांगलेच तापले असून सर्वच पक्षांमध्ये वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत.
इच्छुक उमेदवारांचे नाराजीनाट्य, तसेच इतर पक्षांत प्रवेश अशा काही नाट्यपूर्ण घडामोडींना वेग आला आहे. याच साऱ्या वातावरणात विक्रमगड विकास आघाडीच्या विक्रमगड नगरपंचायतच्या नगराध्यक्षा प्रतिभा पडवळे यांनी त्यांचे पती उमेश पडवळे यांच्यासह भारतीय जनता पक्षामध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवली येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, भाजपचे विक्रमगड तालुका अध्यक्ष जयप्रकाश आळशी उपस्थित होते.
नगराध्यक्षा प्रतिभा पडवळे यांच्या भाजपच्या प्रवेशाने भाजपमध्ये इतर पक्षांतील कार्यकर्त्यांचे इनकमिंग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप प्रवेशाबाबत नगराध्यक्षा प्रतिभा पडवळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी मान्य केले आहे.