मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात होता. मात्र, आता नवीन कोरोना व्हेरिएंट असलेल्या ‘ओमायक्रॉन’ विषाणूचा धोका निर्माण झाल्यामुळे अनेक जिल्हा प्रशासनांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलल्याचे दिसत आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेने शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तर पुणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत तसेच नाशिकमध्ये ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा १० डिसेंबरनंतर सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे राज्यभरात १ डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार असल्या, तरी मुंबई, नाशिक पाठोपाठ आता पुण्यातही या वर्गांच्या शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘ओमायक्रॉन’ या नव्या विषाणूच्या व्हेरिएंटमुळे मुंबई महापालिकेने खबरदारी घेतली असून मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबई महापालिका क्षेत्रातील इयत्ता १ली ते ७वीच्या शाळा आता १ डिसेंबरऐवजी १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह राज्याने कोरोनाची दुसरी लाट यशस्वीरीत्या थोपवून लावल्यानंतर अनेक कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने इयत्ता १ली ते ७ वीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता, मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचा व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’ने दक्षिण आफ्रिका व काही युरोपियन देशात डोके वर काढले. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिकेने शाळा १५ डिसेंबर रोजी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ओमायक्रॉन’मुळे राज्यासह मुंबई महापालिकेतही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच विद्यार्थ्यांचे देखील लसीकरण अद्याप झालेले नाही. अशा अवस्थेत शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम होता, मात्र मंगळवारी सकाळी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी पालिका शिक्षण खात्याचे अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत, मुंबई महापालिका हद्दीतील इयत्ता १ली ते ७वीच्या शाळा १ डिसेंबरऐवजी १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान मुंबई महापालिकेकडून मुंबईत गेल्या १० दिवसांत विदेशातून आलेल्या नागरिकांचा, पर्यटकांचा शोध घेण्यात येत आहे.
पालकांच्या परवानगीनेच शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश
‘ओमायक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र पालकांच्या संमतीपत्राद्वारे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका शिक्षण अधिकारी राजू तडवी यांनी दिली आहे. महाराष्ट्रासह मुंबईतही प्रशासनाने खबरदारी घेतली असून पालकांच्या संमतीपत्राद्वारेच विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षण घ्यायचे असेल त्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येणार आहे, अशी माहिती पालिका शिक्षण अधिकारी (प्रभारी) राजू तडवी यांनी दिली आहे. तसेच शाळा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी आणि सॅनिटायझेशन करणे याबाबतचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने वरीलप्रमाणे निर्णय घेतला आहे, असे राजू तडवी यांनी सांगितले.