मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनातून पावसाळी औषध खरेदी प्रस्तावाची फाईल गहाळ झाली आहे. यामुळे भाजपकडून आता एनसीबीकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे भाजप आमदार मिहीर कोटेचा म्हणाले.
पावसाळी औषधांच्या खरेदीचा प्रस्ताव मंजुरीसाठी महापौरांच्या दालनात पाठवण्यात आला होता. यात मलेरिया, डेंग्यूच्या आजारांवरील औषधांचा समावेश होता. मात्र ही फाईल महापौर कार्यालयातून गहाळ झाल्याचे समोर आले आहे. १४ महिन्यांत १८ वेळा रिमाइंडर देण्यात आले आहे. मुंबईत डेंग्यू, मलेरियाने डोके वर काढले आहे. तरीही या फाईलीबाबतची कार्यवाही झाली नाही. एवढ्या वेळा रिमाइंडर देऊनही महापौरांच्या कार्यालयामधून फाईल गायब झाल्या आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल करणार असल्याचे मिहीर कोटेचा यांनी म्हटले आहे.
दरम्यान या सर्व टेंडरच्या फायली असून गायब होण्यामागे काही आर्थिक हितसंबंध आहे का? असा सवाल देखील कोटेचा यांनी केला आहे. आर्थिक गणितांची जुळवाजुळव किंवा देवाणघेवाण न झाल्याने या फायली गायब करण्यात आल्यात का? असा सवाल करतानाच या फायली गायब करणारा महापालिकेतील वाझे कोण? असा सवालही कोटेचा यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान आता हे प्रकरण महापौरांना अडचणीत टाकणार असल्याचे बोलले जात आहे.