Friday, July 4, 2025

एड्सबाबत समाजात जनजागृती होणे अत्यंत आवश्यक

एड्सबाबत समाजात जनजागृती होणे अत्यंत आवश्यक

पालघर (प्रतिनिधी) : संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे जागतिक एड्स जागरुकता दिवसाचे औचित्य साधून प्राध्यापक अमित पटेल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.


यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. सरिथा कुरीयन, डॉ. अरुण माळी, डॉ. नंदकुमार झांबरे, प्रा. इवॉन सखरानी प्रा. अजितकुमार यादव, प्रा. गुणवंत गडबडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ. रामदास तोंडे यांनी केले.


याप्रसंगी बोलताना प्रा. अमित पाटील म्हणाले की, भारतीय समाजात अजूनही एड्सबाबत हवी तेवढी जागरुकता नाही. अजूनही भेदभावाची भावना आहे. त्यासाठी समाजात जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. या आजाराबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी नेमका हा आजार काय आहे, ते समजून घेणे गरजेचे आहे. केवळ अनैतिक आणि असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यानेच एड्स होतो हा एक गैरसमज आहे. हे खरे असले तरी फक्त हेच एक कारण नाही. अजून अनेक कारणे आहेत, असेही ते म्हणाले.


प्रा. अमित पाटील पुढे म्हणाले की, समाजामध्ये एड्सबाधितांना वेगळ्या नजरेने पाहिले जाते. खरे तर त्यांना समजून घेऊन सहकार्य करण्याची गरज आहे. त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. कृपा फाऊंडेशन वसईच्या माध्यमातून हजारो एचआयव्ही बाधितांना मायेचा हात दिला जातो, याचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. हा रोग कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे पुरेशी माहिती घेऊन सजग राहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. अरुण माळी व डॉ. नंदकुमार झांबरे यांनी सदर कार्यक्रम सफल होण्यासाठी परिश्रम घेतले. कोविडचे नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला.

Comments
Add Comment