मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून महापालिकेने गेल्या वर्षभरात तब्बल रुपये ९३ लाख ८८ हजार ३०० रुपये इतकी दंड वसुली केली आहे. या प्रकरणी ४६ हजार ९९८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान कुलाबा, भायखळा, मरिन लाइन्स, ग्रॅन्टरोड,अंधेरी, गोरेगाव, मालाड या भागांत थुंकणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून पालिकेने सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांवर तसेच थुंकणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. रस्त्यावर थुंकू नये, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरा असे आवाहन पालिकेकडून सतत करण्यात येत आहे. तरी अनेक जण रस्त्यावर थुंकत असल्याचे निर्दशनास येत आहे. अशा लोकांवर महापालिकेकडून कारवाई केली जाते.
दरम्यान १७ एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२१ अखेरपर्यंत ४६ हजार ९९८ पिचकारी बहाद्दरांवर कारवाई करत ९३ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कुलाबा, सॅण्डहर्स रोड, मरिन लाइन्स, ग्रॅन्टरोड, भायखळा या भागांतून ४३९ दिवसांत ६४ लाख ८१ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले आहे.