Monday, April 28, 2025
Homeक्रीडाविजयाचा घास हिरावला

विजयाचा घास हिरावला

पाहुण्यांच्या शेवटच्या जोडीने नाबाद ५२ चेंडू खेळत टाळला पराभव

कानपूर (वृत्तसंस्था) : कानपूर कसोटीच्या शेवटच्या दिवशी रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या फिरकीपटूंच्या जोडीने किवींच्या फलंदाजीचे कंबरडे मोडत भारताला विजयासमीप आणले. पण रचिन रवींद्र आणि अजाझ पटेल या भारतीय वंशाच्या न्यूझीलंड फलंदाजांच्या शेवटच्या जोडीने तब्बल ५२ चेंडूंचा सामना करत भारताचा विजय रोखला. त्यामुळे जवळपास घशात गेलेला विजयाचा घास किवींनी बाहेर काढत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. अंधुक प्रकाशामुळे खेळ वेळेआधीच थांबवल्यामुळे भारतीय खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.

कसोटीत भारतीय उपखंडातील खेळपट्ट्या फिरकीपटूंना अनुकूल असतात. त्यात शेवटच्या दोन दिवसांत त्या अधिक घातक होतात. त्यामुळे फलंदाजांचा कस लागतो. कानपूर कसोटीत त्याचाच प्रत्यय आला. पण तरीही भारताला विजयापासून दूर ठेवण्यात न्यूझीलंडला यश आले. दुसऱ्या डावात टॉम लॅथम वगळता एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे भारताचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता; परंतु रचिन रवींद्र आणि अजाझ पटेल या पाहुण्यांच्या शेवटच्या जोडीने तब्बल ५२ चेंडू खेळले. जडेजा, अश्विन या दोन्ही गोलंदाजांचा किवींच्या शेवटच्या जोडीने यशस्वी सामना केला. अंधुक प्रकाशामुळे वेळेआधीच खेळ थांबवावा लागला असला तरी ५२ चेंडूंत शेवटच्या फलंदाजाला बाद करण्यात अपयश आल्याने भारतीय गोलंदाजांची ही नामुष्की असल्याचे जाणकारांकडून म्हटले जात आहे.

किवींसमोर विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य होते. दुसऱ्या डावात पाहुण्यांचे १६५ धावांवर ९ फलंदाज बाद झाले.

एका फलंदाज बाद अशा परिस्थितीत शेवटच्या दिवशी फलंदाजीला उतरलेला न्यूझीलंडचा संघ जेमतेम दुसरे सत्र खेळेल असा कयास वर्तवला जात होता. पण टॉम लॅथम आणि विलियम सोमरविल्ले या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची संयमी भागीदारी करत विजय टाळण्याचा प्रयत्न केला. उमेश यादवने विलियम सोमरविल्लेला शुबमन गिलकरवी झेलबाद करत भारताच्या विजयाच्या आशा जागवल्या. त्यानंतर टॉम लॅथमही फार काळ टिकला नाही. अश्विनने टॉम लॅथमचा त्रिफळा उडवत किवींना तिसरा धक्का दिला. टॉम लॅथमने १४६ चेंडूंत ५२ धावांची संयमी खेळी केली. कर्णधार केन विल्यमसन एका बाजूला तळ ठोकून होता; मात्र दुसरीकडून बाद होण्याचे सुरूच होते.

रॉस टेलर, हेन्री निकोलस, टॉम ब्लंडेल हे फलंदाज स्वस्तात परतले. त्यात विल्यमसनचाही संयम सुटला. कायले जेमीसन, टीम साऊदी हे दोन्ही फलंदाजही फार काळ थांबले नाहीत. त्यानंतर भारताच्या विजयाआड रचिन रवींद्र आणि अजाझ पटेल ही शेवटची जोडी होती. त्या दोघांनी बराच वेळ मैदानात तळ ठोकला. रचिन रवींद्रने ९१ चेंडूंत नाबाद १८ धावा केल्या. तर अजाझ पटेलने २३ चेंडूंत नाबाद २ धावा केल्या. या जोडीने ५२ चेंडूंचा सामना करत न्यूझीलंडचा पराभव वाचवला.

अश्विन, जडेजाने केली दमदार कामगिरी

रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या फिरकीपटूंच्या जोडगोळीने दुसऱ्या डावात किवींच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. जडेजाने २८ षटके फेकत पाहुण्यांच्या ४ फलंदाजांना बाद केले. त्यात १० निर्धाव षटके फेकली. तर अश्विनने ३० षटके फेकत पाहुण्यांच्या ३ फलंदाजांना माघारी धाडले. अश्विनने ३५ धावा देत १२ निर्धाव षटके फेकली. या जोडीने ७ फलंदाजांना बाद केले. या दोन्ही गोलंदाजांनी यष्टीवर टिच्चून मारा करत पाहुण्यांना नकोसे करून टाकले. उमेश यादव आणि अक्षर पटेल या गोलंदाजांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.

‘भारतीयांनी’च रोखला भारताचा विजय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूर कसोटी सामना सोमवारी सोमांचक स्थितीत अनिर्णीत राहिला. भारताचा विजय रोखण्यात न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या शेवटच्या जोडीने ५२ चेंडू खेळत किवींचा पराभव टाळला. विशेष म्हणजे हे दोन्ही न्यूझीलंडचे खेळाडू भारतीय वंशाचे आहेत. रचितचे वडील साल १९९० दरम्यान भारतातून न्यूझीलंडमध्ये स्थायीक झाले. ते आधी बंगळूरुमध्ये राहत होते. तर एजाजचा जन्मच मुंबईत झाला होता. तो आठ वर्षांचा असतानाच त्याचे कुटुंब न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. त्यामुळे भारताचा विजय रोखणारे हे दोन्ही खेळाडू भारतीय वंशाचे आहेत.

विकेट घेण्यात अश्विनने टाकले हरभजन सिंगला मागे

न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला माघारी धाडत भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने हरभजन सिंगला मागे टाकले आहे. आर अश्विनने कारकिर्दीतील ८० व्या कसोटी सामन्यात ४१८ वी विकेट घेत ही मोठी कामगिरी केली. हरभजनच्या खात्यात ४१७ बळी आहेत. कसोटीत बळी मिळवण्यात पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमला मागे टाकण्याची कामगिरी अश्विनने शनिवारी केली होती.

भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. अनिल कुंबळेने १३२ कसोटी सामन्यांमध्ये ६१९ बळी घेतले आहेत. त्यानंतर कपिल देव यांच्या नावावर १३१ कसोटी सामन्यांमध्ये ४३४ कसोटी बळी घेण्याचा विक्रम आहे. अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे, त्यावरून येत्या चार-पाच कसोटी सामन्यांमध्ये तो कपिल देवलाही मागे टाकेल, असे दिसते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -