मुंबई (प्रतिनिधी) : जगभरात ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या घातक व्हेरिएंटमुळे मोठी खळबळ माजली असून राज्य सरकारही सतर्क झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतून गेल्या १० नोव्हेंबरपासून म्हणजे १९ दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत एक हजारांच्या आसपास प्रवासी आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आता या सर्व प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ वेगाने फैलावत असल्याने संपूर्ण जगाला चिंता सतावत आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत. केंद्र सरकारसोबत राज्य सरकारने तेथून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध आणले असताना हाती आलेल्या माहितीने चिंता वाढवली आहे.
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात सोमवारी बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी मुंबई आणि मुंबईबाहेर कोठे गेले आहेत, याचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या सर्व प्रवाशांचा शोध सुरू असून जे मुंबईतच थांबले आहेत, त्यांचाही शोध घेतला जात आहे. ओमिक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. मुंबईत ठिकठिकाणी कोविड सेंटर्ससाठी तयारी करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. मुंबईत सध्या १०२ टक्के लसीकरण (पहिला डोस) झाले असून दुसरा डोस ७२ टक्के पूर्ण झाला आहे. आता लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्यात येणार असून दोन डोसमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता असून तशी विनंतीही राज्य सरकारने केंद्र सरकारला केल्याचेही पर्यटन मंत्री म्हणाले.
मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरीत्या मिळत राहावी, जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल, असे सांगितले. परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमानसेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न असून पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत करण्यात यावे, यावर बैठकीत चर्चा झाली.
जागतिक आरोग्य संघटनेकडून इशारा
जेनेव्हा, स्वित्झरलँड : जागतिक आरोग्य संघटनेकडून दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’बद्दल धोक्याचा इशारा जाहीर करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉन हा अधिक धोकादायक ठरू शकतो. अगदी काही दिवसांतच ओमिक्रॉन जगभरात हातपाय पसरू शकतो, अशीही शक्यता जागतिक आरोग्य संघटनेकडून व्यक्त करण्यात आलीय. उल्लेखनीय म्हणजे, अद्याप ‘ओमिक्रॉन’च्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. दरम्यान, जगभरात ‘ओमिक्रॉन’चे जवळपास १६० रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, बोत्सवाना, यूके, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, इस्रायल, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, इटली, जर्मनी आणि हाँगकाँग या देशांत ‘ओमिक्रॉन’ आढळून आला आहे.