Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे महापालिकेच्याच वास्तूत वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा राडा

ठाणे महापालिकेच्याच वास्तूत वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा राडा

सहायक आयुक्त, नगरसेवकांनाच बसण्यास केला विरोध

ठाणे (वार्ताहर) : ठाणे महापालिकेच्याच मालकीची वास्तू असलेल्या नौपाडा प्रभाग समितीच्या जुन्या इमारतीमध्ये मंगळवारी दुपारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बांगर यांनी अक्षरशः राडा केला. महापालिकेच्या सभा आता प्रत्यक्ष घेण्यात येत असल्याने शाहू मार्केट येथील जुन्या इमारतीमध्ये मंगळवारी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी आधीच नौपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शंकर पाटोळे येऊन बसल्यानंतर या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बांगर आले. पालिकेच्याच वास्तूमध्ये येऊन पाटोळे यांना अरेरावी करत त्यांनी उठवले. त्याशिवाय मिटिंगसाठी आलेल्या प्रभाग समिती सभापती तसेच इतर नगरसेवकांना तुम्हाला या ठिकाणी बसण्याचा अधिकार नसल्याचे सांगत त्यांनाही अरेरावी केली. अखेर प्रकरण नौपाडा पोलीस ठाण्यापर्यंत गेले. मात्र त्या ठिकाणीही बांगर यांची अरेरावी कमी झाली नाही. अखेर बांगर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मूमिका नगरसेवकांनी घेतली.

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला पोलीस बंदोबस्त देण्यात आला असून त्यासाठी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिक्रमणाची कारवाई असल्यास नऊ प्रभाग समितीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले जाते. पूर्वी वरिष्ठ निरीक्षकांना बसण्यासाठी कळवा प्रभाग समितीच्या बाजूला जागा देण्यात आली होती. मात्र ती इमारत धोकादायक झाल्यानंतर आता महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता त्यांनी थेट मार्केट येथील नौपाडा प्रभाग समितीमध्ये बसण्यास सुरुवात केली. गांवदेवी येथील नवीन कार्यालयात सभागृह नसल्याने महिन्याची प्रभाग समितीची बैठक शाहू मार्केट येथील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी त्या ठिकाणी सहायक आयुक्त शंकर पाटोळे येऊन बसले असताना त्या ठिकाणी आलेल्या बांगर यांनी पाटोळे यांना अरेरावी करत उठायला सांगितले. एवढ्यावर ते थांबले नाहीत तर बैठकीसाठी आलेल्या प्रभाग समितीच्या सभापती फाटक, नगरसेवक विकास रेपाळे, संजय वाघुले, मीनल संख्ये या नगरसेवकांना देखील त्यांनी जुमानले नाही. अखेर प्रकरण नौपाडा पोलीस ठाण्यापर्यंत गेले. यावेळी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्या ठिकाणीही बांगर यांची अरेरावी पाहायला मिळाली. अखेर बांगर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी केली.

पालिका आयुक्त काय भूमिका घेणार?

पालिकेच्याच वास्तूमध्ये येऊन पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधीशी अरेरावी करणाऱ्या तसेच त्यांना बसण्यास विरोध करणाऱ्या या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या विरोधात पालिका आयुक्त काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे पालिकेच्याच वास्तूमध्ये येऊन अधिकारी आणि लोकप्रतिनिधीना पोलिसांकडून अरेरावी करण्याचा पहिल्यांदाच प्रकार घडला आहे.

तुमची महापालिका गेली खड्ड्यात…

महापालिकेच्या मालकीची वास्तू असताना महापालिकेच्याच अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना अरेरावी करणाऱ्या बांगर यांनी तुमची महापालिका गेली खड्ड्यात अशा शब्दांत लोकप्रतिनिधीना सुनावले. या ठिकाणी तुम्हाला बसण्याचा अधिकार नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधीना यावेळी त्यांनी सुनावले. तुमच्याच महापालिकेने मला या ठिकाणी बसण्यास परवानगी दिली असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र अशा प्रकारे परवानगी देण्यात आली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -